एस.टी.अधिकाऱ्यांनी केली स्थानकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:52+5:302020-12-30T04:19:52+5:30
नाशिक: शहरातील बसस्थानकांमधील स्वच्छता हा नेहमीचा विषय आहे. प्रवाशांची गर्दी आणि सातत्याने असलेली वर्दळ यामुळे स्वच्छता राखण्यासाठी महामंडळाला सातत्याने ...
नाशिक: शहरातील बसस्थानकांमधील स्वच्छता हा नेहमीचा विषय आहे. प्रवाशांची गर्दी आणि सातत्याने असलेली वर्दळ यामुळे स्वच्छता राखण्यासाठी महामंडळाला सातत्याने प्रयत्न करावे लागतात. स्थानकांमधील अस्वच्छतेबाबत आगार प्रमुखांनी सोमवारी पाहणी करून कर्मचाऱ्यांना नियमित स्वच्छतेच्या सूचना दिल्या.
काेरोनानंतर बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेबाबत अधिक काळजी घेण्याच्या सूचना महामंडळाने केलेल्या आहेत. गेल्या एक ते १५ डिसेंबर या कालावधीत राज्यपातळीवर स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण बसस्थानकासह येथील स्वच्छतागृह, विश्रांतीगृहे तसेच कार्यालयीन परिसराची देखील स्वच्छता करण्याची मोहीम राबविण्यात आली होती.
नाशिक शहरात जुने सीबीएस, महामार्ग बसस्थानक तसेच नवीन सीबीएस बसस्थानकातून प्रामुख्याने प्रवासी वाहतूक केली जाते. रेल्वेस्थानक लगत असलेल्या नाशिकरोड येथील बसस्थानकातून देखील मोठी प्रवासी वाहतूक होते.पंचवटी डेपोतून शहरातील सर्वात मोठ्या भागात वाहतूक केली जाते. त्यामुळे या स्थानकांवर सातत्याने वर्दळ असल्याने सर्व प्रकारच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, काही उणिवा नक्कीच असून त्याबाबतचा देखील आढावा घेण्यात आल्याचे समजते.
--कोट--
नियमित स्वच्छतेला प्राधान्य
प्रवाशांना स्थानकामध्ये चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठीचा प्रयत्न असून बसस्थानकाच्या नियमित स्वच्छतेबाबत काळजी घेतली जाते. दररोज सकाळी बसस्थानक आणि परिसराची पाहणी केली जाते. स्थानकात वाढलेले गवत काढण्याबाबत तसेच केरकचरा उचलण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
-दिलीप नलावडे, आगारप्रमुख