एस.टी. कर्मचाऱ्यांना पुन्हा पगाराची धाकधूक; तारीख उलटून गेल्याने पगाराचा तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:19 AM2021-08-18T04:19:56+5:302021-08-18T04:19:56+5:30
राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती अजूनही फारशी बरी नाही. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी खर्च आणि ...
राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती अजूनही फारशी बरी नाही. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च निघू शकेल, अशी परिस्थिती नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीच चिंता असते. शासनाकडून कर्ज घेऊन कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात आलेले आहे. आता मात्र अपेक्षित उत्पन्न नसल्याने अनिश्चितता वाढली आहे.
--इन्फो--
आकडे काय सांगतात
एकूण बसेस ८६५
१९००: वाहक
२१००: चालक
५४३: अधिकारी,कर्मचारी
--इन्फो--
उसणवारी तरी किती करायची एस.टी. महामंडळाची परिस्थिती काय आहे,याची कल्पना आहे. परंतु कर्मचाऱ्यांचे पोटपाणी या नोकरीवरच असल्याने त्यांनी काय करावे. अगोदरच कमी पगार, त्यातही पगाराची अनिश्चितता असल्याने देवाण-घेवाणीचे व्यवहार कसे करावे, असा प्रश्न पडतो. विलंबाने वेतन झाल्यामुळे अनेक अडचणी येतात.
- रामदास कोथमिरे, कर्मचारी.
मागील वर्षापासून वेतनाबाबतची चिंता लागलेली आहे. वेतन होते; परंतु वेळेत होणे अपेक्षित आहे. वर्ग-३ आणि वर्ग-४ चे वेतन कमी असल्यामुळे त्यांना पूर्ण वेतन मिळावे तसेच इतर वेतन खर्चात काही टक्के कपात करून नियोजन केल्यास दरमहा सर्वांच्यात हातात पगार पडेल. सर्वत्र वेतन कपात सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या वेतनात काही टक्के कपात त्यांना परवडणारी आहे.
- शांताराम लेवे, कर्मचारी.
--इन्फो--
कमी उत्पन्न, खर्च अधिक
१) महामंडळाला मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ पुर्णपणे बिघडला आहे. त्यामुळे गाड्यांचे सुटे भाग तसेच डिझेलवरील खर्च महामंडळाला परवडणारा नाही. त्यामुळे अनेक सुट्या भागांची खरेदी रखडलेली आहे.
२) सध्या सुरू असलेल्या बसेसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे वेतन होऊ शकेल इतके उत्पन्न मिळते. मात्र इतर खर्च करण्याला पैसा उरत नाही. महामंडळाला अजूनही ४० टक्केपेक्षा अधिक तोटा आहे.
३) ज्या प्रमाणे खरेदीत खर्चाची कपात सुरू आहे, त्याप्रमाणेच अधिकाऱ्यांच्या वेतनातही कपात केली तर वेतनाचाही ताळमेळ बसू शकेल. सध्या थकीत देणीदेखील थांबविण्यात आलेली आहेत.
--इन्फो---
कर्मचाऱ्यांना दरमहा सात तारखेला वेतन दिले जाते; मात्र यंदा सात तारीख उलटून गेलेली असूनही वेतन हाती पडलेले नाही. आता केवळ दहा दिवस झाले असले तरी साधारण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वेतनाची तजवीज होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या हाती पेमेंट स्लीप आल्यामुळे त्यांचा पेमेंट निघाल्यासारखेच आहे. त्यास काही दिवस विलंब होऊ शकतो.