एसटीची जागा की डम्पिंग ग्राउंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:16 AM2019-04-01T01:16:23+5:302019-04-01T01:16:40+5:30
दत्तमंदिररोड एसटी महामंडळाच्या खुल्या जागेवर माती, केरकचरा आणून टाकला जात असल्याने डम्पिंग ग्राउंड झाले आहे. सदर ठिकाणी वाढलेल्या बाभळीच्या झाडांच्या जंगलामध्ये अनेक गैरप्रकार सुरू असून, रहिवाशांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे.
नाशिकरोड : दत्तमंदिररोड एसटी महामंडळाच्या खुल्या जागेवर माती, केरकचरा आणून टाकला जात असल्याने डम्पिंग ग्राउंड झाले आहे. सदर ठिकाणी वाढलेल्या बाभळीच्या झाडांच्या जंगलामध्ये अनेक गैरप्रकार सुरू असून, रहिवाशांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे. याबाबत महापालिकेच्या नाशिकरोड विभागाने कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे़
नाशिकरोड परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली तरी अद्यापही काही ठिकाणी मोकळ्या जागा आहेत़ दत्तमंदिररोड विकास गतिमंद शाळेशेजारी असलेल्या एसटी महामंडळाच्या मोकळ्या पडीक भूखंडावर मोठ्या प्रमाणात केरकचरा आणून टाकला जात असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच खासगी इमारत बांधताना किंवा मनपाच्या कामाकरिता खोदाई केल्यावर निघणारी माती त्या ठिकाणी आणून टाकली जात असल्याने मातीचा डोंगर झाला आहे. तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाभळीच्या झाडांचे जंगल निर्माण झाल्याने सदर ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गैरकृत्य चालू असतात.
बाभळीच्या जंगलात व आनंदनगर येथील एसटी महामंडळाच्या मालकीच्या डेपोत मद्यपींच्या पार्ट्या दिवसभर झडत असतात. व्हाईटनर, अमलीपदार्थ सेवन करणाऱ्यांचा अड्डा झाला आहे. तसेच प्रेमीयुगुल व महिलांचा वावर या ठिकाणी वाढला आहे.
मनपा शाळा क्रमांक १२५ च्या मैदानाच्या आतमध्ये व रस्त्यावर बाहेरील बाजूस रिक्षा, चारचाकीमध्ये, दुचाकीवर व झाडाखाली प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत असतात. त्यांना कोणी हटकले तर संबंधितास शिवीगाळ, दादागिरी केली जाते. पोलिसांची व्हॅन लांबूनच सायरत वाजवत येत असल्याने पोलीस येण्यापूर्वीच संबंधित सावध होऊन पळून जातात़ त्यांच्यावर कारवाई करावी़
एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर खोदकामाची माती व केरकचरा टाकतात़ तसेच सोमाणी उद्यान परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते, त्या ठिकाणी उरलेले, उष्टे अन्नपदार्थ टाकतात.
४मनपा व पोलिसांनी दंडात्मकऐवजी फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे. तसेच एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून, दुर्लक्ष झाल्यास मनपाने कारवाई केली पाहिजे. ४कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे़ याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़
पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज
एसटी महामंडळाची मोकळी जागा, आनंदनगर डेपो, इमारत, मनपा शाळा क्रमांक १२५ चे मैदान, आर्टिलरी सेंटररोड, मनपा क्रीडांगण व त्यापुढील गाळ्याच्या बाजूला स्वच्छतागृहात झालेला गांजा पिणाऱ्यांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी नियोजन करून सापळा रचून धिंड काढत कारवाई करणे गरजेचे आहे. छेडछाड, भाईगिरी व धूम स्टाईल दुचाकी चालविणाºयांना खाकीचा हिसका दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.