एसटीच्या २६ कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या; अनेकांवर कारवाईची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 03:40 PM2022-01-04T15:40:44+5:302022-01-04T15:41:31+5:30
नाशिक - कामावर परतण्यासाठी सर्वप्रकारचे पर्याय देऊनही संपावरील एसटी कर्मचारी कामावर परतले नसल्याने निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू ...
नाशिक - कामावर परतण्यासाठी सर्वप्रकारचे पर्याय देऊनही संपावरील एसटी कर्मचारी कामावर परतले नसल्याने निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत २६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याने त्यांची सेवा संपुष्टात आली असून, एसटीतील सेवेचा मार्ग बंद झाला आहे. आणखी १७० जणांना नोटिसा बजाविण्यात आल्याने त्यांच्यावरही बडतर्फीची टांगती तलवार आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या ६८ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एकीककडे एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना बोलविण्याचे सुरू असलेले प्रयत्न, तर दुसरीकडे न्यायालयीन लढाई सुरू असताना महामंडळाच्या स्थानिक विभागाकडून कारवाईदेखील सुरू होती. या काळात जिल्ह्यातील ४४९ कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले त्यांच्यावर आता बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. सोमवारी १७ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले, तर शुक्रवारी नऊ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले हेाते.
या कर्मचाऱ्यांना आता महामंडळाचे दरवाजे बंद झाले आहेत. निलंबित करण्यात आलेल्यापैकी आणखी १७० जणांनादेखील कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. बडतर्फ करण्यापूर्वीची ही नोटीस असून, या कर्मचाऱ्यांवरदेखील पुढील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारवाईची टांगती तलवार असली तरी कर्मचाऱ्यांनी मात्र संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे.
रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांंना अभय
बडतर्फीची कारवाई करण्यापूर्वी कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय दिले जाणार असल्याचे संकेत एसटी महामंडळाकडून दिले जात आहे. कामावर हजर होण्याची इच्छा असलेल्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना कामावर रुजू करून घेतले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.