एस.टी. बस तिकिटांच्या अपहाराचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:44 AM2019-06-20T00:44:42+5:302019-06-20T00:45:42+5:30
राज्य परिवहन महामंडळाचे आधुनिकीकरण होत असताना अनेक प्रकारच्या त्रुटीदेखील अनेकदा समोर आलेल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात खासगी शिवशाही बसेस दाखल झाल्यानंतर सतत चर्चेत राहणारे महामंडळ आता राज्यातील डेपो स्तरावरील गैरकारभार आणि तिकिटातील गैरप्रकारामुळे पुन्हा लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आहे.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाचे आधुनिकीकरण होत असताना अनेक प्रकारच्या त्रुटीदेखील अनेकदा समोर आलेल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात खासगी शिवशाही बसेस दाखल झाल्यानंतर सतत चर्चेत राहणारे महामंडळ आता राज्यातील डेपो स्तरावरील गैरकारभार आणि तिकिटातील गैरप्रकारामुळे पुन्हा लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाने अनेक बदलांच्या घोषणा आणि उपाययोजना करण्याबरोबरच मदतीसाठीचे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. मात्र त्यांच्या या घोषणांमुळे त्यांना टीकेलाच अधिक सामोरे जावे लागले आहे. सफाई व्यवस्थेचे कंत्राट असो की शिवशाही बसेसचे अपघात, कोट्यवधींची मदत, तिकिटाचे खासगीकरण आणि अपघातांविषयी लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित केले असताना आता तिकिटातील अपहारावरदेखील तारांकित प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील अनेक आमदारांनी महामंडळातील तिकीट अपहाराबाबत महामंडळाकडे विचारणा केलेली आहे. राज्य परिवहन महामंडळातील वाहकांकडून तिकिटाचा अपहार होत असल्याची सुमारे २९,००० प्रकरणे एप्रिल महिन्यापर्यंत दाखल झाली आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अपहाराची प्रकरणे दाखल झाल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न बुडल्याचादेखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. महामंडळाचे उत्पन्न जर अशा प्रकरणांमुळे कमी होणार असेल तर या गैरप्रकाराविषयी राज्यातील व्याप्ती मोठी असू शकते. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातील आगार प्रमुखांकडून तिकीट अपहाराच्या प्रकरणांची माहिती मागविण्यात आलेली आहे.
संबंधित प्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यामुळे सर्व आगारांनी १५ एप्रिल रोजीची अपहाराची प्रलंबित प्रकरणे किती? वाहकांची एकूण प्रलंबित प्रकरणे किती? मे अखेरपर्यंत एकूण अपहाराच्या प्रकरणांची माहितीदेखील मागविण्यात आलेली आहे. राज्यातील राज्य परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक, विभाग नियंत्रक यांच्याकडून संपूर्ण माहितीचा तपशील मागविण्यात आलेला आहे.
नाशिकमध्ये १५ प्रकरणे?
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक विभागात एप्रिल महिन्यात प्रलंबित प्रकरणांची संख्या १५ असल्याचे समजते. तर वाहकांची एकूण प्रकरणेदेखील १५ आहेत. यापूर्वी डेपो क्रमांक १ मधील कर्मचाऱ्याच्या आदेशामुळे घडलेल्या अपघात प्रकरणीदेखील माहिती मागविण्यात आलेली होती. मात्र येथील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पुरेशी माहिती न दिल्यामुळे संबंधितावर कारवाई होता होता वाचली. कर्मचाºयांच्या संदर्भात अनेक प्रकरणे ही डेपोस्तरावरच रफादफा केली जात असल्यामुळे येथील गैरप्रकारांना वरिष्ठ अधिकाºयांचादेखील आशीर्वाद आहे का अशी चर्चा मात्र लपून राहिलेली नाही.