एस.टी.ने पुन्हा धरली परराज्याची वाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:14+5:302021-09-23T04:16:14+5:30
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आता सुरळीत सुरू झाल्याने महामंडळाला दिलासा मिळाला आहे. आंतरजिल्हा बसेस सुरू असल्या तरी ग्रामीण, ...
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आता सुरळीत सुरू झाल्याने महामंडळाला दिलासा मिळाला आहे. आंतरजिल्हा बसेस सुरू असल्या तरी ग्रामीण, दुर्गम भागातील बसेस अजूनही पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. असे असतानाही परराज्यात जाणाऱ्या बसेसची मागणी कायम आहे. त्यामुळे नाशिकमधून गुजरात, इंदौर, अहमदाबाद, सूरत, वापी येथे जाण्यासाठी बसेस सुरू झाल्या असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. आंतरराज्य बससेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने होती. इतर राज्यांच्या बसेस नाशिकमध्ये येत हेात्या. परंतु नाशिकहून बसेस सुरू झालेल्या नव्हत्या. आता या बसेसही सुरू झाल्या आहेत.
--इन्फो--
वापीकडे जाणारी बस फुल्ल
नाशिकहून गुजरातमधील वापीकडे जाणाऱ्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या बसेस फुल्ल होत आहेत. सुरुवातीपासून नाशिक-वापी बससेवा सुरू असल्याने व्यापाराच्या दृष्टीने या बसेसची मागणी पहिल्यापासून आहे. त्यामुळे गुजरातमधून नाशिकला येणारे आणि नाशिकहून गुजरातला जाणाऱ्यांची संख्या चांगली असते. गुजरातसाठी बसेस सुरू करण्याची मागणी नेहमीच असते. अनेकांचे अर्थचक्र या बसवर अवलंबून आहे.
--इन्फो--
परराज्यात जाणाऱ्या बसेस
नाशिक- इंदौर
नाशिक- गुजरात
(सूरत, बडोदा, वापी, अहमदाबाद)--इन्फो--
९० टक्के चालक-वाहकांचे लसीकरण पूर्ण
नाशिक विभागातील ९० टक्के चालक-वाहकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जे कर्मचारी दीर्घ रजेवर आहेत त्यांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणही ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. संपूर्ण कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यावर महामंडळाने भर दिला आहे. तशा सूचना डेपो स्तरावर देण्यात आलेल्या आहेत.
--इन्फो--
आता बहुतेक मार्गांवरील बसेस सुरू झाल्यामुळे महामंडळाची सेवा हळूहळू गतिमान होत आहे. त्यामुळे महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये देखील समाधान दिसून आहे. कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नाही. असे असतानाही महामंडळाने जास्तीत जास्त सुरक्षित प्रवासी सेवा देण्यावर भर दिला आहे. आता तर बसेस मायक्रोबायोल पद्धतीने सॅनिटाइझ केल्या जात आहेत.
220921\22nsk_17_22092021_13.jpg
एस.टी.ने पुन्हा धरली परराज्याची वाट!