एसटी कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:12 AM2020-12-08T04:12:25+5:302020-12-08T04:12:25+5:30
विभागीय कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थिंना १४ ऑक्टोबरपासून वेतन मिळाले नाही. त्यातच त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या ...
विभागीय कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थिंना १४ ऑक्टोबरपासून वेतन मिळाले नाही. त्यातच त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात प्रशिक्षणार्थिंनी सोमवारी (दि.७) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एनडी पटेल रोडवरील विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले.
पेठ रस्त्यावरील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत १०६ प्रशिक्षणार्थी आहेत. प्रशिक्षणार्थींना एसटीकडून दर महिन्याला विद्यावेतन दिले जाते; मात्र काेरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या २३ मार्चपासून प्रशिक्षणार्थींना कार्यशाळेत येणे शक्य झाले नाही. लॉकडाउनमधील एप्रिल व मे महिन्याचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींना देण्यात आले होते; मात्र शिकाऊ उमेदवार असा उल्लेख नसल्याने नाराजी आहे.
एसटी प्रशासनाने प्रशिक्षणार्थींना १ जूनला नोटीस बोर्ड, तसेच व्हाॅटसॲपद्वारे काम थांबविण्यात आले असल्याचे कळवून विद्यावेतन मिळणार नसल्याचे सांगितले होते. कार्यशाळा प्रशासाने विनाविद्यावेतन पुढील साडेचार महिने काम करावे, अन्यथा परीक्षेच्या वेळी अडवणूक करण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रशिक्षणार्थिंनी केला आहे.
दरम्यान, विभागीय कार्यशाळेत कार्यरत असलेले अनेक प्रशिक्षणार्थी जिल्हाबाहेरील असून, विद्यावेतन मिळणार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवणार आहे. इतर शासकीय-निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थींप्रमाणेच विद्यावेतन दयावे, अशी मागणी प्रशिक्षणार्थींकडून केली जात आहे.
चौकट
प्रमुख मागण्या
लॉकडाऊन कालावधीतील केलेल्या कामाचा मोबदला द्यावा, प्रशिक्षणाचे दिवस तत्काळ भरून द्यावेत, पुढे वाढविलेल्या कालावधीसाठी विद्यावेतन मिळण्याची हमी द्यावी, परीक्षेदरम्यान अडवणूक होणार, याची ग्वाही द्यावी.