साधुग्राममध्ये साचले कचऱ्याचे ढीग
By Admin | Published: September 16, 2015 11:38 PM2015-09-16T23:38:08+5:302015-09-16T23:38:08+5:30
सर्वत्र पसरली दुर्गंधी; आजार पसरण्याची भीती
पंचवटी : तपोवन साधुग्राम परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधीचे वातावरण पसरल्याने साधू-महंतांना, तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
साधुग्राम परिसरात कायम स्वच्छता राहावी, यासाठी दैनंदिन घंटागाड्या कचरा जमा करण्याचे काम करतात. याशिवाय सफाई कर्मचारी रस्ते सफाईचे काम करत असले तरी तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचून आहे. याशिवाय या साचलेल्या पाण्याच्या जवळच मोठ्या प्रमाणात जेवणाच्या पत्रावळी, तसेच उरलेले खरकटे अन्न जमा होत असल्याने ही दुर्गंधी सुटली असल्याचे बोलले जात आहे. साधुग्राममध्ये प्रवेश केल्यानंतर साधारणपणे दोनशे फूट अंतर पार केल्यानंतर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने तपोवन साधुग्राम बघण्यासाठी आलेल्या भाविकांना नाकातोंडावर रुमाल ठेवूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दुर्गंधी सुटली असल्याने प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन औषध फवारणी करणे गरजेचे आहे. येथील काही साधू-महंत तसेच साधुग्राममध्ये येणारे भाविक हे उघड्यावरच लघुशंका करत असल्याने त्यातच दैनंदिन जमा होणारा केरकचरा यामुळेच दुर्गंधी सुटली आहे. (वार्ताहर)