मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:26 AM2020-01-09T00:26:02+5:302020-01-09T00:26:18+5:30
मनपा प्रभाग २२च्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असून, निवडणूक शाखेकडून बुधवारी दुपारी सर्व मतदान केंद्रे व तेथील खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. मतदान प्रक्रियेचे सर्व साहित्य पोहचविण्यात आले आहे. तर उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मतदानाचे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिकरोड : मनपा प्रभाग २२च्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असून, निवडणूक शाखेकडून बुधवारी दुपारी सर्व मतदान केंद्रे व तेथील खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. मतदान प्रक्रियेचे सर्व साहित्य पोहचविण्यात आले आहे. तर उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मतदानाचे नियोजन करण्यात आले आहे.
मनपा प्रभाग २२ च्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि.९) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे. दहा मतदान केंद्रांतील ३९ खोल्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक शाखेकडून बुधवारी दुपारपर्यंत सर्व मतदान केंद्र व तेथील खोल्यांचा ताबा घेण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी, मतदान प्रक्रियेचे साहित्य, ईव्हीएम मशीन आदी सर्व मतदान केंद्रांवर बसमधून पाठविण्यात आले. यासाठी २१५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर मतदान केंद्र व परिसराचा ताबा पोलिसांनीदेखील घेतला असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडावी यासाठी बुधवारी सायंकाळी नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, उपनगरचे सुनील रोहकले व त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातून संचलन करण्यात आले.
पोटनिवडणुकीतील पक्षीय, अपक्ष उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून मतदारांना स्लिपा पोहोचविणे व मतदान दिनाची तयारी करण्यात येत होती. मतदारांना आणण्यासाठी वाहनांचे नियोजन व मतदान केंद्राबाहेर बूथ लावण्यासाठी मंडप उभारण्यात येत होते.