.नर्मदा बचाव कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
By admin | Published: April 16, 2015 12:30 AM2015-04-16T00:30:27+5:302015-04-16T00:30:50+5:30
आयुक्तालयात ठिय्या : मेधा पाटकर यांच्यासह कार्यकर्त्यांची कार्यालयात धडक
नाशिकरोड : जमिनी दाखवून पैशाची आॅफर न देता पुनर्वसन झालेच पाहिजे, सातपुड्यातील आदिवासींचे प्रश्न मार्गी लागलेच पाहिजे, आदिवासींचे स्थलांतर करून सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी अचानक विभागीय आयुक्त कार्यालयात धडक मारून ठिय्या आंदोलन सुरू केले. मुंबईला कामानिमित्त गेलेले विभागीय आयुक्त एकनाथ डवले गुरुवारी सकाळी येणार असल्याने आंदोलनकर्त्यांनी आयुक्त कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले होते.
नर्मदाकाठच्या आदिवासींचे स्थलांतर व विविध प्रश्नांसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कुठलीही पूर्वसूचना न देता विभागीय आयुक्त कार्यालयावर विविध वाहनांतून येत धडक दिली. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोपनीय शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत पाळदे हे एकटेच विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपस्थित होते. त्यांनी आयुक्त कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. मात्र आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देत बंद केलेले प्रवेशद्वार उघडून थेट विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या दालनासमोरील खुल्या जागेत ठिय्या मांडून घोषणा देत आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्ते आयुक्तांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलीस कर्मचारी पाळदे यांनी दरवाजा लावून धरत आंदोलनकर्त्यांना अटकाव केला.
सरदार सरोवराचे बांधकाम गुजरात सरकारचा विचार करूनच वाढविण्यात आले आहे. १२२ मीटरवरून १३९ मीटरचे गेट बसविल्याने पावसाळ्यात बुडीत क्षेत्राची पातळी वाढणार आहे. महाराष्ट्रातील ३३ गावांतील सुमारे १२०० आदिवासी कुटुंबांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. ३५० कुटुंबांचे वसाहतीत स्थलांतर होऊनही पुनर्वसन धोरणानुसार सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. सरदार सरोवराचे काम गेल्या ८ वर्षांपासून पुढे सरकू शकलेले नाही. महाराष्ट्रातील १२०० कुटुंबे व मध्य प्रदेशातील ४० हजारांहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन बाकी आहे. जमीन दाखवा, वसाहती बसवा, स्थलांतर करा, वसाहतीत विविध सोयी-सुविधा द्या आदि विविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या समर्थकांनी बुधवारी दुपारी अचानक धडक मारत ठिय्या आंदोलन सुरू केले. पुरवठा उपआयुक्त रावसाहेब बागडे, रोजगार उपआयुक्त अनिल पुरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.