मुद्रांक शुल्क आकारणी शिवसेना हाणून पाडेल
By admin | Published: May 18, 2017 12:53 AM2017-05-18T00:53:59+5:302017-05-18T00:54:43+5:30
सुभाष देसाई : कुटुंबात कटुता होण्याची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्य सरकारने घरगुती मालमत्ता हस्तांतरणाच्या व्यवहारात मुद्रांक शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय शिवसेना हाणून पाडेल, अशी घोषणा शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. रक्ताच्या नातेवाइकांना मालमत्ता बक्षीसपत्राने वा देणगीने देताना यापूर्वी पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या आधारे दान करता येत होती, सरकारने या निर्णयात बदल करून यापुढे दान वा बक्षीसपत्राने मालमत्ता देण्यासाठी मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून, त्यातून सरकारला वार्षिक तीनशे कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सुभाष देसाई यांनी, शिवसेनेचा सरकारच्या या निर्णयाला विरोध असून, रक्ताच्या नात्यात मालमत्ता हस्तांतरण अथवा दान देण्याच्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय शासनाला मागे घेण्यास भाग पाडेल, अशी घोषणा केली.कौटुंबिक संबंधांना अपशकुनसरकारचा हा निर्णय म्हणजे कौटुंबिक संबंधांना अपशकुन केला जातो की काय असे वाटू लागले असून, एकत्रित कुटुंब पद्धतीच्या भावनेला खो घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. एकीकडे तीनवेळा तलाकला विरोध दर्शवायचा व दुसरीकडे अशा प्रकारची शुल्क आकारणी करून कुटुंब विघटन करण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.