स्थायी सभापतीही बिनविरोध शक्य
By admin | Published: April 6, 2017 02:12 AM2017-04-06T02:12:11+5:302017-04-06T02:12:24+5:30
नाशिक : महापौर-उपमहापौर निवडीप्रमाणेच महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाचीही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे
नाशिक : महापौर-उपमहापौर निवडीप्रमाणेच महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाचीही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने तौलनिक संख्याबळाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असल्याने सदर निवडणुकीत सहभागी व्हायचे की नाही, याबाबत कायदेशीर सल्ला मागविला आहे. दरम्यान, भाजपातच सभापतिपदासाठी चुरस आहे.
स्थायी सभापतिपदासाठी येत्या शुक्रवारी (दि.७) निवडणूक घेण्यात येणार आहे. सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.६) सकाळी ११ ते २ या वेळेत दाखल करण्याची मुदत आहे. स्थायी समितीवर भाजपा- ९, शिवसेना- ४, कॉँग्रेस- १, राष्ट्रवादी- १ आणि मनसे- १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचाच सभापती होणार हे निश्चित आहे. त्यामुळे निवडणुकीची केवळ औपचारिकता पार पडणार आहे. विभागीय आयुक्तांनी शिवसेना-रिपाइं एकत्रित गटनोंदणी करून घेण्यास नकार दिल्याने तौलनिक संख्याबळात सेनेची एक जागा कमी झाली. त्यामुळे शिवसेनेने विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, न्यायालयाने विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांना त्यांचे म्हणणे चार आठवड्यांत मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील सुनावणी येत्या २७ एप्रिलला होणार
आहे. (प्रतिनिधी)