स्थायी समितीचा चेंडू महापाैरांच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:01+5:302021-02-05T05:35:01+5:30
सदस्य नियुक्ती: भाजपत खल सुरूच नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा एक सदस्य वाढविण्यासाठी नगरसचिवांनी बुधवारी ...
सदस्य नियुक्ती: भाजपत खल सुरूच
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा एक सदस्य वाढविण्यासाठी नगरसचिवांनी बुधवारी (दि.३) महापौर सतीश कुलकर्णी यांना पत्र दिले आहे. त्यामुळे आता या संदर्भात महापौर आणि सत्ताधारी भाजपचा खल सुरू झाला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन याबाबत विशेष सभा बोलवावी किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
महापालिकेत भाजपच्या ६६ या एकूण संख्याबळात दोन नगरसेवकांची घट झाल्याने, पक्षीय तौलनिक बळावर परिणाम झाला आहे. त्यामुळे स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढत असून, भाजपचा एक सदस्य कमी होत आहे, असा शिवसेनेचा दावा आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल सेनेच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे त्या संदर्भातील निकालपत्र आणि सेनेच्या एका सदस्याची निवड व्हावी, यासाठी नगरसचिव राजू कुटे यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना पत्र दिले आहे. त्यावर भाजप खल करीत असून, गुरुवारी (दि.४) निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून सर्वप्रथम गटनेते विलास शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी हे प्रकरण विभागीय आयुक्तांच्या अखत्यारित असल्याचे न्यायालयाने महापालिकाच निर्णय घेण्यास सक्षम आहे, असे म्हटले होते, तर आता बोरस्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेतील ताज्या निकालात मात्र उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळेच या संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन महापौर निर्णय घेतील, असे भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी सांगितले.
इन्फो...
गेल्या वेळी स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेकडून नियुक्तीसाठी तिसरे ज्योती खोले यांचे नाव महापौरांकडे देण्यात आले होते. मात्र, महापाैरांनी ते स्वीकारले नव्हते. मात्र, आता खोले यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे.