स्थायी समिती वाद, कायदेशीर सल्लामसलत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 07:37 PM2021-02-04T19:37:23+5:302021-02-05T00:14:30+5:30
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीबाबत आता सत्तारूढ भाजपाने कायदेशीर सल्लामसलत सुरू केली असून उच्च न्यायालयातील वकील एम. एल. पाटील यांचा सल्ला मागितला आहे. त्यानंतरच महापौर निर्णय घेणार आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीत पक्षीय तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेचा एक सदस्य नियुक्त करण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याची सत्तारूढ भाजपाने तयारी केली असली तरी कायदेशीर सल्ला मसलत करून मगच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेता सतीश सोनवणे आणि गटनेता जगदीश पाटील यांनी बराच खल केल्यानंतर नगरसचिवांना कायदेशीर सल्ला घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार गुरूवारी (दि.४) ॲड. एम. एल. पाटील यांचा कायदेशीर सल्ला मागविण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने याचिका दाखल करणाऱ्या विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळवू नये यासाठी सर्वोच्च न्यायलयात अगोदरच कॅव्हेट दाखल केले आहे.