स्थायी समितीचे दात घशात

By admin | Published: September 30, 2015 11:47 PM2015-09-30T23:47:28+5:302015-09-30T23:47:28+5:30

साधुग्राम स्वच्छता ठेका : कामाचा गोषवारा केवळ माहितीस्तव सादर

Standing committee grinds teeth | स्थायी समितीचे दात घशात

स्थायी समितीचे दात घशात

Next

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळ आटोपला, तरी साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्याचे कवित्व अद्यापही सुरूच आहे. आता ठेकेदारांची बिले अदा करण्याची वेळ येऊन ठेपल्यावर प्रशासनाने स्थायीकडून दरपत्रक व खर्चास मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट करत केलेल्या कामाचा गोषवारा केवळ माहितीस्तव सादर केला असून, स्थायी समितीचे दात घशात घालत बोळवण केली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचे पडसाद गुरुवारी (दि. १) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळात साधुग्राममधील स्वच्छतेचा ठेका वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स या कंपनीला देण्यावरून स्थायी समिती विरुद्ध प्रशासन असा संघर्ष अजूनही सुरूच आहे. सदर प्रकरण सध्या न्यायप्रवीष्ट असून, वॉटर ग्रेस कंपनीने उच्च न्यायालयात स्थायी समितीसह प्रशासनाला प्रतिवादी केले आहे. स्थायी समितीने वॉटर ग्रेस कंपनी ही महापालिकेची थकबाकीदार आणि काळ्या यादीत असल्याने सदर कंपनीला ठेका न देता द्वितीय न्यूनतम निविदाधारक क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस या कंपनीची शिफारस केली होती.
दरम्यान, प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचल्याने प्रशासनाने साधुग्राममधील स्वच्छतेचे काम मे. दिग्विजय एंटरप्रायझेस आणि सय्यद असिफ अली यांच्याकडून करून घेतले. सदर काम करून घेण्यासही स्थायी समितीने विरोध दर्शविला होता, शिवाय साधुग्राममध्ये अचानक पाहणीदौरा करत ठेकेदाराकडून करारनाम्यानुसार सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप केला होता.
ई-निविदेतील सूचना पत्रकानुसार गोदाघाट, भाविक- मार्गावरील कामगारांचा उपयोग अन्य ठिकाणीही करण्याचे अधिकार महापालिकेकडे असल्याचे नमूद करण्यात आलेले असल्याने त्या आधारे आयुक्तांनी सदर कंत्राटदारांच्या मनुष्यबळाचा वापर साधुग्राममध्ये केल्याचे स्पष्टीकरण स्थायी समितीला प्रशासनाकडून देण्यात आले होते. परंतु, स्थायीच्या अधिकारावर गदा आणण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत समितीच्या सदस्यांनी प्रशासनावर जोरदार प्रहार केले होते.
आता कुंभपर्वणी आटोपल्यानंतर संबंधित ठेकेदारांची बिले अदा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशावेळी सदर कामाच्या कार्योत्तर मंजुरीचा विषय स्थायीवर येणे आवश्यक असल्याचे समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. परंतु, प्रशासनाने गुरुवारी (दि.१) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत पर्वणीकाळात साधुग्राममध्ये केलेल्या स्वच्छतेच्या कामाचा गोषवारा केवळ माहितीस्तव सादर करत स्थायी समितीची बोळवण केली आहे.

Web Title: Standing committee grinds teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.