‘स्थायी’च्या बैठकीत ‘दीपावली मिलन’विरोध मावळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 04:41 PM2017-10-09T16:41:00+5:302017-10-09T16:41:05+5:30
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील बैठकीत इतिवृत्त मंजुरीवरून सभात्याग करतानाच सभापतींच्या निर्णयाविरुद्ध नगरसचिवांकडे पत्र देत एल्गार पुकारणाºया दहा सदस्यांचा विरोध सोमवारी (दि.९) झालेल्या सभेत मावळला आणि सभापतींनी इतिवृत्तास दुरुस्तीसह मंजुरी दिल्याने ‘दीपावली’ मिलनही झाले.
दि. २५ सप्टेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी काही सभांची इतिवृत्ते मंजूर करण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, सभापतींनी त्याची दखल न घेतल्याने विरोधकांनी गोंधळ घातला होता. याशिवाय, काही प्रस्तावांनाही आक्षेप घेण्यात आला होता. परंतु, त्यालाही सभापतींनी दाद न दिल्याने शिवसेना, राष्टÑवादी व अपक्ष सदस्यांनी सभात्याग केला होता. त्यानंतर स्थायी समितीतील शिवसेनेचे सदस्य सूर्यकांत लवटे, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, अपक्ष मुशिर सय्यद, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांच्यासह भाजपाचे मुकेश शहाणे, जगदीश पाटील, सुनीता पिंगळे व श्यामकुमार बडोदे यांनी आपल्या स्वाक्षºयांचे पत्र नगरसचिवांना देत काही सभांची इतिवृत्ते मंजूर करण्यास विरोध दर्शविला होता. सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनीही सभापतीविरुद्ध विरोधकांशी हातमिळवणी केल्याने त्याची गंभीर दखल पक्षस्तरावर घेतली गेली होती. त्यातून शहराध्यक्षांनी चारही भाजपा सदस्यांना समज दिली होती. दरम्यान, सोमवारी (दि.९) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पुन्हा एकदा मुशिर सय्यद यांनी ‘त्या’ पत्राचे स्मरण सभापतींना करून दिले असता सभापतींनी तत्काळ सदर इतिवृत्त दुरुस्तीसह मंजूर करत असल्याचे स्पष्ट करत वादावर पडदा टाकला आणि सभा खेळीमेळीत पार पडल्याचा आनंदही आयुक्तांसमोर व्यक्त केला. या साºया घटनाघडामोडीत नेमके कोण पाऊल मागे घेतले, याचा उलगडा झाला नसला तरी ‘दीपावली’ मिलन झाल्याची चर्चा मात्र रंगली होती.