जिल्हा परिषदेची स्थायी सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 01:21 AM2021-11-19T01:21:25+5:302021-11-19T01:22:19+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा पदाधिकारी, सदस्यांच्या गैरहजेरीमुळे तहकूब करावी लागली. खुद्द अध्यक्षांनीच कामकाजामुळे सदरची सभा तहकूब करण्याची सूचना केल्यामुळे सभा तहकूब करावी लागल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे प्रशासन सभागृहात केलेल्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनीही सभेवर बहिष्कार टाकल्याची चर्चा करण्यात आली.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा पदाधिकारी, सदस्यांच्या गैरहजेरीमुळे तहकूब करावी लागली. खुद्द अध्यक्षांनीच कामकाजामुळे सदरची सभा तहकूब करण्याची सूचना केल्यामुळे सभा तहकूब करावी लागल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे प्रशासन सभागृहात केलेल्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनीही सभेवर बहिष्कार टाकल्याची चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा गुरुवारी (दि. १८) बोलविण्यात आली होती. प्रशासनाने या सभेची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना काही खासगी काम असल्यामुळे त्यांनी बुधवारी (दि. १७) काही पदाधिकारी, सदस्यांना सभा पुढे ढकलण्यात येत असल्याचे कळविले. तशी कल्पना प्रशासनालाही दिली. त्यामुळे गुरुवार (दि. १८) च्या सभेला एकही पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहू न शकल्याने सभा तहकूब करावी लागली. मात्र, सभेच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व खाते प्रमुख जिल्हा परिषदेत उपस्थित होते. तथापि, गेल्या सभेत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने काही पदाधिकारी व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन ठरावाची अंमलबजावणी करीत नसल्याच्या कारणामुळे स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार टाकण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेत घडवून आणण्यात आली व त्यामुळेच सभा होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले.
चौकट===
दोन दिवसांपासून व्यक्तिगत कामांची घाई सुरू आहे. गुरुवारच्या (दि. १८) स्थायी समितीच्या सभेत अध्यक्ष म्हणून आपल्याला उपस्थित राहणे जमणार नव्हते. त्यामुळे आदल्या दिवशीच (बुधवारी) सर्व पदाधिकारी, सदस्यांना दूरध्वनी करून मी सभा होणार नसल्याचे कळविले होते. प्रशासनालाही त्याची कल्पना दिली होती. माझे व्यक्तिगत काम हेच सभा तहकुबीमागचे कारण आहे.
- बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष. जि. प.