सेंट्रल किचनची स्थायीकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:00 AM2020-01-14T00:00:43+5:302020-01-14T01:36:44+5:30
सेंट्रल किचनच्या ठेक्यातील अनेक बाबी नियमबाह्य असल्याचे महासभेत आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी पथके नेमून गेल्या आठवड्यात तेराही सेंट्रल किचनला अचानक भेटी दिल्या. त्यानंतर सोमवारी (दि.१३) स्थायी समितीने नियुक्त केलेल्या चौकशी समितीनेदेखील भल्या सकाळी अशा प्रकारे भेटी दिल्या. यात अनेक गैरप्रकार आढळल्याचे सांगितले जात असून, समितीतच हा सर्व अहवाल सादर केला जाणार आहे.
नाशिक : सेंट्रल किचनच्या ठेक्यातील अनेक बाबी नियमबाह्य असल्याचे महासभेत आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी पथके नेमून गेल्या आठवड्यात तेराही सेंट्रल किचनला अचानक भेटी दिल्या. त्यानंतर सोमवारी (दि.१३) स्थायी समितीने नियुक्त केलेल्या चौकशी समितीनेदेखील भल्या सकाळी अशा प्रकारे भेटी दिल्या. यात अनेक गैरप्रकार आढळल्याचे सांगितले जात असून, समितीतच हा सर्व अहवाल सादर केला जाणार आहे.
स्थायी समितीने पोषण आहारातील घोटाळ्यांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. या समितीत दिनकर पाटील, संतोष साळवे, स्वाती भामरे, सुषमा पगारे यांच्या बरोबरच शिक्षणाधिकारी देवीदास महाजनदेखील आहेत. रविवारी (दि.१२) रात्री या समितीने पाहणी करण्याचे ठरविल्यानंतर सकाळी सहा वाजता ‘रामायण’ येथे सर्व सदस्य जमले आणि त्यानंतर त्यांनी एका ठेकेदारच्या किचनला भेट दिली. त्याचप्रमाणे एका शाळेलादेखील भेट दिली आणि तेथील अवस्था बघितली. यात अनेक प्रकारची अनियमितता आढळल्याचे समजते. येत्या स्थायी समितीत यासंदर्भात अहवाल सादर केला जाणार आहे.
शहरातील मनपा आणि अन्य खासगी शाळांतील सव्वा लाख विद्यार्थ्यांना सेंट्रल किचन अंतर्गत मध्यान्ह भोजन देण्यात येत आहे. महापालिकेने ही प्रक्रिया योजना राबविण्यासाठी तेरा ठेके दिले आहेत. सदरचे ठेके देताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप असून महासभेत यासंदर्भात नगरसेवकांची ठेकेदारावर प्रशासनाने कशाप्रकारे मेहरबानी केली त्याची चिरफाड केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने छोट्या छोट्या म्हणजे अगदी एका शाळेसाठी एका पुरवठादार पुरवण्याचे निर्देश दिले असताना उलट आर्थिक उलाढालीचा निकष वाढवून काही संस्था बाद कशा करता येईल याची काळजी घेण्यात आली. निविदेत अनेक प्रकारच्या अटी पात्र करत नसतानादेखील ठेके देण्यात आले. त्याचप्रमाणे निविदा दिल्यानंतर नियमभंग होत होता.
भेटीचे केले मोबाइलवर चित्रीकरण
गेल्या आठवड्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याने ठेकेदार निश्चिंत होते. मात्र, त्यानंतर सोमवारी (दि.१३) नगरसेवकांनी अचानक भेटी दिल्या. सकाळी रामायण येथे सर्व सदस्य जमल्यानंतर एका सेंट्रल किचनला भेट देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. त्याचबरोबर सर्वजण एकाच मोटारीत बसून गेले. किचन आणि शाळेत भेट दिल्यानंतर मोबाइल फोन एकाच ठिकाणी ठेवण्यात आले असले तरी सर्व भेटीचे एका मोबाइलमध्ये चित्रीकरण ठेवण्यात आले आहे.