१५ कोटींच्या निविदा मंजुरीसाठी स्थायीत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:17 AM2021-02-25T04:17:47+5:302021-02-25T04:17:47+5:30
मालेगाव : म्हाळदे शिवारातील कचरा डेपोवरील घनकचऱ्याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी १५ कोटी २५ लाख ७५ हजारांची ...
मालेगाव : म्हाळदे शिवारातील कचरा डेपोवरील घनकचऱ्याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी १५ कोटी २५ लाख ७५ हजारांची निविदा ११ विरुध्द ५ मतांनी स्थायी समितीच्या बैठकीत बहुमताने मंजूर करण्यात आली. बुधवारी स्थायी समिती सभागृहात सभापती राजाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत माळदे शिवारातील कचरा डेपोवरील सुमारे ४ लाख क्युबिक मीटर घनकचऱ्याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. जनाधार सेवाभावी संस्थेच्या प्राकलन रकमेपेक्षा १०.२५ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्याच्या विषयावर दीर्घकाळ चर्चा झाली. मात्र, तोडगा निघाला नाही. या विषयासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात १५ कोटी २५ लाख ७५ हजार रुपयांची निविदा मंजूर करण्याच्या बाजूने ११ मते तर ५ मते विरोधात गेली. त्यामुळे हा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला तसेच प्रभाग क्रमांक चारमधील सिमेंट रस्ता, प्रभाग क्रमांक २ व ३ मधील जलवाहिनीची गळती दुरुस्ती, दैनंदिन देखभाल, व्हाॅल्व्ह दुरुस्तीच्या प्रत्येकी ५० हजारांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. या बैठकीला स्थायी समिती सदस्य, विभागप्रमुख उपस्थित होते.