‘स्टार’चे प्रक्षेपण महागणार
By admin | Published: October 29, 2014 12:14 AM2014-10-29T00:14:56+5:302014-10-29T00:15:11+5:30
केबल दरात वाढ शक्य : नोव्हेंबरपासून अंमलबजावणी
नाशिक : स्टार या मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या खासगी दूरचित्रवाहिनीने आपले प्रत्येक चॅनल पे केल्याने येत्या नोव्हेंबरपासून केबलचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, यापुढे केबल ग्राहकाला हवे असलेले परंतु पैसे अदा करण्याची तयारी असलेलेच स्टारचे चॅनल दूरचित्रवाहिन्यांवरून पाहता येतील.
स्टार कंपनी व हॅथवे या खासगी दूरचित्रवाहिन्यांचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या कंपनीत झालेल्या तंट्याची सुनावणी दिल्लीच्या ‘टीव्ही सॅट’ या प्राधिकरणाकडे अलीकडेच झाली. त्यात स्टार कंपनीने यापुढे स्टार कंपनीचे चॅनल कोणत्याही पॅकेजविना न दाखविता प्रत्येक चॅनलसाठी वेगवेगळे दर आकारले जातील असे लिहून दिले व त्याची अंमलबजावणी येत्या १ नोव्हेंबरपासून करण्याचे ठरविण्यात आले आहे. देशपातळीवर स्टार कंपनीने हे धोरण स्वीकारल्याने आता केबलद्वारे स्टारचे चॅनल प्रसारित करणाऱ्या कंपन्यांनाही त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. सध्या स्टार कंपनीचे स्टार गोल्ड, स्टार प्रवाह, स्टार न्यूज, स्टार मुव्ही, स्टार स्पोर्ट असे सुमारे ३० हून अधिक चॅनल्स सुरू आहेत. यापूर्वी स्टारचे सर्व चॅनल एकाच पॅकेजमध्ये आणून ते केबलद्वारे प्रक्षेपित केले जात. यापुढे मात्र आता प्रत्येक चॅनलचे वेगवेगळे दर असणार आहेत. केबलचालकाकडून प्रत्येक ग्राहकाची आवड विचारूनच सदरचे चॅनल दाखविले जातील व त्यासाठी नियमित केबल शुल्कापेक्षा अधिकची रक्कम अदा करावी लागणार आहे. स्टार चॅनलचे सर्व पॅकेज घेतल्यास ग्राहकाला साधारणत: पन्नास रुपयांइतके अधिकचे शुल्क भरावे लागेल. नाशिक शहरात डेन व इन या दोन कंपन्यांकडून १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.