चैतन्यपर्व सोहळ्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:29 AM2017-09-22T00:29:32+5:302017-09-22T00:30:16+5:30
सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वाधी साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी जयोस्तुते ।। असा जयघोष करत नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी (दि. २१)पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
नाशिक : सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वाधी साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी जयोस्तुते ।।
असा जयघोष करत नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी (दि. २१)पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे साडेपाच वाजता जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते कालिका देवीची पारंपरिक पद्धतीने पूजन करून घटस्थापना करण्यात आली. याशिवाय अन्य देवी मंदिरांतही आदिशक्तीच्या जागराला सुरुवात झाली.
पहाटे महापूजा झाल्यानंतर सकाळी ७ वाजता महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते अभिषेक करून देवीची आरती करण्यात आली. गुरुवारी पहाटेपासूनच कालिका देवी मंदिरात सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले होते. देवीभक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी महापौर रंजना भानसी यांनी सर्व भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे यासाठी कालिका देवी मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करत नाशिककरांनी मोठ्या संख्येने देवीचे दर्शन घेण्याचे अवाहन केले. यावेळी नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेवक शालिनी पवार, पोपटराव भानसी यांच्यासह कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव पाटील, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया, सुरेंद्र कोठावळे, आबा पवार, विजय पवार, संतोष कोठावळे आदि उपस्थित होते. नेहेमीप्रमाणे देवीची यात्रा सुरू झाली असली तरी यंदा प्रशासनाने मूर्तींचे स्टॉल्स उभारण्यास निर्बंध घातल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले नाही. अनेक छोट्या आणि खेळणी, फुगे तसेच अन्य साधने विक्रेत्यांनी थेट रस्त्याच्या कडेला ठाण मांडून विक्री करण्यास सुरूवात केली आहे. सांडव्यावरील देवी मंदिरात तसेच शहरातील पूरातन ग्राम देवता भद्रकाली मंदिरातही उत्साहात घटस्थापना करण्यात आली.