दीपोत्सवाला प्रारंभ ; गोशाळांमध्ये गायी-वासरांची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:17 AM2018-11-05T00:17:01+5:302018-11-05T00:17:29+5:30
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस, यानिमित्त रविवारी (दि.४) गायी-वासरांची पूजा करण्यात आली. सिडको, पंचवटी, सातपूर आदींसह परिसरातील गोशाळांमध्येदेखील वसूबारसचा सण साजरा करण्यात आला.
नाशिक : दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस, यानिमित्त रविवारी (दि.४) गायी-वासरांची पूजा करण्यात आली. सिडको, पंचवटी, सातपूर आदींसह परिसरातील गोशाळांमध्येदेखील वसूबारसचा सण साजरा करण्यात आला. आश्विन कृष्ण द्वादशीला वसूबारस म्हणजे गोवत्स द्वादशी साजरी करण्यात आली. या दिवसापासून दिवाळी सणाला प्रारंभ होतो. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून गाय-वासराची पूजा करण्यात येते. महिलांनी उपवास करून गाय-वासरांना गोग्रास भरवून त्यांची पूजा केली. नाशिक-पेठ रस्त्यावर नंदिनी गोशाळेत वसूबारस सण साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नरचे उद्योजक ओमप्रकाश गर्गे, नैतिकपूर शनिपीठाचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणदास अग्रवाल, पुणे येथील सुशील अग्रवाल आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवर, स्नेहिजन व महिलांच्या हस्ते गाय-वासरांची औक्षण करून पूजा करण्यात आली. तसेच गायींसाठी तयार केलेल्या नवीन शेड््सचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी नंदिनी गोशाळा ट्रस्टचे अध्यक्ष नेमिचंद पोद्दार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रदीप बूब, कोषाध्यक्ष अनिरुद्ध जाजू, सचिव शिल्पा मेहता, कार्याध्यक्ष संतोष सिंघानिया, विश्वस्त वसंत खैरनार, सेडूराम रुंग्टा, नीळकंट पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, पंचवटी, तपोवनातील गोशाळा तसेच सिडको, मोरवाडी, सातपूर, पिंपळगाव बहुला आदी भागातील गोशाळांमध्ये जाऊन महिलांनी गायी-वासराची पूजा केली.