डोंगऱ्यादेव उत्सवाला प्रारंभ
By admin | Published: December 19, 2015 11:32 PM2015-12-19T23:32:45+5:302015-12-19T23:33:17+5:30
पिळकोस : आदिवासी बांधवांसह ग्रामस्थांचा उत्साह
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथे डोंगऱ्यादेव उत्सवाला प्रारंभ झाला आहे. या उत्सवात आदिवासी बांधवांसह ग्रामस्थांचा उत्साह दिसुन येतो.
या उत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे या उत्सवात गावातील आदिवासी कुटुंबातील एक सदस्य पंधरा दिवस या देवाचे कडक व्रत करतो व हा उत्सव ऐन हिवाळ्यात येत असून उत्सव साजरा करण्याची जागा ही पूर्वीपासून कायमची निचित असते. त्या जागेवर चारही बाजूंनी काठ्यांचे कुंपण करून एक द्वार ठेवले जाते. त्या प्रवेश द्वाराला गोमूत्र ठेवले जाते व प्रत्येकाने ते अंगावर शिंपडून खळीत प्रवेश करावयाचा असतो. खळीत मांडव टाकल्यावर मध्यभागी देवदांडा उभा केला जातो, देवदांड्याला झेंडूच्या माळा बांधल्या जातात व सायंकाळी रात्रभर या देवदांड्याभोवती आदिवासी बांधव भाया हे फेर धरून नाचतात. या उत्सवात प्रत्येक सदस्याला माउली म्हटले जाते. उत्सवाच्या सुरुवातीला प्रत्येक कुटुंब आपल्या घरातील सदस्य हा या उत्सवातील मुख्य जोखीमदार भगत याच्या स्वाधीन करतात. उत्सव सुरुवातीपासून ते हा उत्सव सुरळीत पार पडेपर्यंत या सर्व भायांची जबाबदारी भगतावर असते. या उत्सवाचा प्रारंभापासूनचा विधी, पौर्णिमेच्या दिवशी गड घेण्यासाठी गेल्यावर वनदेवता प्रसन्न झाल्यावर डोंगराने दर्शन देण्यासाठी डोंगर जागा देते व तेथून रात्री घरी सुखरूप येईपर्यंत भगत हा सर्वांचा जिवाचा जोखीमदार असतो. या उत्सवात मनोरंजनासाठी पावरी वाद्य वाजवले जाते, तर थाळीवर वनदेवतेच्या कथा सांगण्यात येतात. दररोज दिवसभर माउल्या या शिधा घेण्यासाठी बाहेरगावी जातात व सायंकाळी मुख्य खळीवर मनोरंजन कार्यक्रम केले जातात. पौर्णिमेला शेवटच्या दिवशी डोंगरावर गड घेण्यासाठी गेले असता डोंगरावर दिवे लावले जातात. देवळात कोंबडा सोडला जातो, याबाबत जुने जाणकार वृद्ध जे आजही हयात आहेत ते जुन्या काळी भाया उत्सव साजरा करत तेव्हाची अशी आख्यायिका आहे की पूर्वी भगत व भाया यांची एवढी कडक उपासना होती की गड घेण्यासाठी डोंगरावर गेले असता पौर्णिमेच्या रात्री या सर्व माउल्या डोंगरात उंच काठीसमवेत प्रवेश समाविष्ट करत, त्यावेळेस डोंगरातील देवतेच्या ठिकाणाची पूजा, दर्शन घेऊन भाया परत येत. उत्सव साजरा करणाऱ्या माउल्या हा विधी चुकल्यामुळे सर्व माउल्या वनदेवतेने डोंगर उघडल्यावर मध्ये गेल्यावर अजूनही आल्या नसून यामुळे या उत्सवात भगत हा माउल्यांसाठी महत्त्वाचा असतो, यामुळेच या उत्सवकाळात आदिवासी महिला या कुंकू लावत नाहीत, जेवणात तेलाचा वापर करत नाही, पाट्यावर मसाला वाटत नाहीत, दूध, भाजीत मीठ खात नाहीत, भाजीपाला खात नाही, आहारात फक्त डाळी खातात. अशा या ग्रामीण भागाचे आराध्य व श्रद्धेच्या देवात डोंगऱ्यादेव उत्सवाला प्रारंभ झाला आहे.