उद्यानांची परवड सुरूच
By admin | Published: June 22, 2016 11:33 PM2016-06-22T23:33:59+5:302016-06-23T00:03:51+5:30
निविदांना अत्यल्प प्रतिसाद : देखभालीअभावी दुरवस्था
नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून शहरातील उद्यानांची देखभाल-दुरुस्तीअभावी परवड सुरूच असून, वारंवार निविदा प्रक्रिया राबवूनही मक्तेदारांकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता पावसाळ्यात उद्यानांची देखभाल महत्त्वाची ठरणार असल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा २३० उद्यानांसाठी निविदा काढल्या आहेत.
शहरातील उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीचा ठेका यापूर्वी बचत गटांकडे सोपविण्यात आला होता. परंतु, निविदा प्रक्रियेत खुली स्पर्धा व्हावी आणि बचत गटांकडे उद्याने न देता एकाच ठेकेदाराकडे त्याचे व्यवस्थापन असावे यासाठी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सुमारे २९६ उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी एकत्रित निविदा काढली होती. परंतु, महासभेने सदर प्रस्ताव फेटाळून लावत बचत गटांमार्फत देखभाल-दुरुस्ती करण्याचा ठराव संमत केला होता. त्यानुसार, प्रशासनाने बचत गटांसाठी निविदाप्रक्रिया राबविली, परंतु खासगी मक्तेदारासाठी नमूद केलेल्या अटी-शर्ती कायम ठेवल्या. त्यामुळे, बचत गटांचा त्याला अत्यल्प प्रतिसाद लाभला. त्यानंतर पुन्हा एकदा निविदा काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु तेथेही अपयशच पदरी पडले. दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी महापौर व आयुक्तांची भेट घेऊन उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीत लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावेळी महापौरांनी बचत गटांचा आग्रह सोडत संबंधित मक्तेदारास मात्र ६० टक्के महिला कर्मचाऱ्यांना स्थान देण्याची अट घातली.