गोपीकृष्ण जयंती महोत्सवास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:25 AM2017-08-19T00:25:30+5:302017-08-19T00:26:26+5:30
घुंगरांचा श्रवणीय पदन्यास, तबल्यातून उमटलेले सूर आणि नृत्याच्या अनोख्या मिलाफाने शुक्रवारी (दि. १८) पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे तीन दिवस चालणाºया या महोत्सवाचे भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नाशिक : घुंगरांचा श्रवणीय पदन्यास, तबल्यातून उमटलेले सूर आणि नृत्याच्या अनोख्या मिलाफाने शुक्रवारी (दि. १८) पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे तीन दिवस चालणाºया या महोत्सवाचे भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कीर्ती कलामंदिर यांच्यातर्फे आयोजित २४व्या पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे यावर्षीचे पहिले पुष्प आदिती नाडगौडा-पानसे यांनी गुंफले. यावेळी ‘रिदमिक पॉइज’ या संकल्पनेवर आधारित कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ‘बाजे डमरू हर हर’ या जोगी रागातील शिववंदनेने झाली. संगीत आणि नृत्याचा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमात यानंतर झपताल पेश करण्यात आला. यामध्ये श्रवणीय पदन्यासासह पेशकार, कायदे, रेले प्रस्तुत करण्यात आले तसेच पेशकार ते द्रुत झपताल अशा अवीट प्रवासाला रसिकांनीदेखील मनमुराद दाद दिली. यानंतर अभिनयातून बंदिशीचे दर्शन घडवत एकाच नायिकेच्या विविध छटा दाखविताना नायिकेचे विराहोत्कांठिता, खंडिता आणि तिच्या प्रियकराच्या स्वप्नात कशी समरस होते याचे दृश्य दाखविण्याचा प्रयत्न कीर्ती कलामंदिरच्या शिष्यांनी केला. आदिती नाडगौडा-पानसे यांच्या संकल्पनेवर तसेच अविराज तायडे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘दि रिदमिक पॉइज’ कार्यक्रमात बल्लाळ, चव्हाण आणि ओमकार अपस्तंभ (तबला), सुभाष दसककर (संवादिनी) यांनी साथसंगत केली, तर आशिष रानडे आणि ज्ञानेश्वर कासार (गायन), तर आदित्य कुलकर्णी आणि केतकी साठ्ये - रानडे यांनी पढंत केली. सूत्रसंचालन वैशाली बालाजीवाले यांनी केले. या महोत्सवाअंतर्गत शनिवारी (दि. १९) नंदिनी सिन्हा (दिल्ली) आणि अशोक कृष्णा (बनारस) यांच्या ‘बैठके ठुमरी’, तर रविवारी (दि. २०) शमा भाटे (पुणे) यांचे कथक सादरीकरण आणि पंडित दीपक मुजूमदार यांचे भरतनाट्यम् नृत्य सादर होणार आहे.