महानिर्मितीच्या आंतर ग्रुप क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:04 PM2018-10-04T16:04:19+5:302018-10-04T16:04:37+5:30
या स्पर्धेसाठी चंद्रपूर, भुसावळ, पारस, परळी, नवकिरणीय ऊर्जा नाशिक व पुणे, कोराडी, पोफळी, उरण, एकलहरे येथील सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
एकलहरे : वीज निर्मितीच्या क्षेत्रात काम करताना प्रसंगी गंभीर परिस्थितीलाही तोंड द्यावे लागते. अकस्मात निर्माण झालेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी सांघिक कार्याची गरज असते. ही सांघिक भावना व सकारात्मक ऊर्जा खेळांच्या माध्यमातून निर्माण होते. त्याचा उपयोग कामाच्या ठिकाणी वीज निर्मिती करताना पूरेपूर करून घेता येतो, असे प्रतिपादन महानिर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक कैलास चिरुटकर यांनी केले.
महानिर्मिती कंपनीच्या आंतर ग्रुप क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता उमाकांत निखारे होते, तर प्रमुख म्हणून नितीन चांदूरकर, आनंद भिंताडे, अनिल मुसळे, नितीन वाघ, राहुल दुबे, एन. एम. शिंदे, सुनील इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल मुसळे यांनी केले. या स्पर्धेसाठी चंद्रपूर, भुसावळ, पारस, परळी, नवकिरणीय ऊर्जा नाशिक व पुणे, कोराडी, पोफळी, उरण, एकलहरे येथील सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महानिर्मितीचा ध्वज फडकाविण्यात आला. त्यानंतर हवेत फुगे सोडून व क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय खेळाडू सूर्यकांत पवार यांनी केले. आभार कल्याण अधिकारी निवृत्ती कोंडावले यांनी मानले. कार्यक्रमास सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित होते.