ईएसआय रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:23+5:302021-04-11T04:14:23+5:30
शहराबरोबरच सातपूर विभागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गरीब कष्टकरी कामगार वर्गात लहान लहान घरे आहेत. त्यामुळे गृहविलगीकरण ...
शहराबरोबरच सातपूर विभागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गरीब कष्टकरी कामगार वर्गात लहान लहान घरे आहेत. त्यामुळे गृहविलगीकरण शक्य नसल्याने संपूर्ण कुटुंबाला लागण होत आहे. म्हणून सातपूर विभागासाठी ईएसआय रुग्णालय मनुष्यबळासहित अधिग्रहित करून त्यामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व इतर आवश्यक सुविधा निर्माण करून गरजू रुग्णांसाठी ते तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे गटनेते सलीम शेख, योगेश शेवरे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. हीच मागणी ईएसआय रुग्णालय प्रशासनास प्रत्यक्ष भेटून शेख यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ईएसआय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.९) ईएसआय रुग्णालय प्रशासनाने नगरसेवक सलीम शेख यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन ईएसआय रुग्णालय कोविड सेंटरसाठी ताब्यात घेऊन रीतसर कार्यवाही करावी असे सूचित केले आहे. ईएसआय रुग्णालय प्रशासन कोविड सेंटरसाठी तयार आहे. आता महापालिका प्रशासनाने त्वरित योग्य तो निर्णय घेऊन कोविड सेंटर सुरू करणे अपेक्षित आहे. सातपूर परिसरातील कोरोना रुग्णांसाठी त्वरित कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी नगरसेवक सलीम शेख यांनी केली आहे.