शेतकऱ्यांच्या हितासाठी किमान कांदा बाजार सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:15 AM2021-05-21T04:15:06+5:302021-05-21T04:15:06+5:30
मालेगाव : जिल्यातील कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे सर्व बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माल कुठे विकावा, ...
मालेगाव : जिल्यातील कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे सर्व बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माल कुठे विकावा, असा प्रश्न पडला आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या खळ्यावर जाऊन कांदा विक्री करावी लागत असून, व्यापारी मनमानी भावाने कांदा खरेदी करीत आहेत. लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला पुरेशी किंमत मिळत नाही. आगामी खरीप हंगाम पाहता बाजार समित्यांमध्ये किमान कांदा लिलाव तरी त्वरित सुरु करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मविप्रचे संचालक डॉ. जयंत पवार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यावर घेऊन जात विक्री करावा लागत आहे. या प्रकारामुळे शेतकरी अधिकच त्रस्त आहेत. यातून समाधानकारक भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचा खर्चदेखील वसूल होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी पैशांची नितांत गरज आहे. यातच दोन महिन्यांपासून वेळोवेळी बेमोसमी पाऊस होत असल्याने पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे मिळेल त्या किमतीत शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा विक्री करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन किमान कांदा बाजार सुरु करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. आठवड्यातून किमान चार दिवस तरी कांदा बाजार सुरु ठेवावा. बाजार समित्या सुरू झाल्यास कांद्याला चांगला भाव मिळू शकेल. या मागणीचा गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. पवार यांनी निवेदनात केली आहे.