सिन्नर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहिम सर्वेक्षणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 05:21 PM2018-10-01T17:21:59+5:302018-10-01T17:26:10+5:30
सिन्नर तालुक्यात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर दरम्यान पंतप्रधान प्रगती योजनेंतर्गत कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय बैठक घेवून सदर मोहिमेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.
सहसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) पुणे यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कुष्ठरोग शोध मोहिमेच्या सर्वेक्षणास तालुक्यात प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर मोहिमेत सर्वे करणाऱ्या आशा व पुरूष स्वयंसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका यांचे सर्वेक्षणासंदर्भात प्रशिक्षण घेण्यात आले. तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आशा समन्वयक यांची कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत कुष्ठरोग शोध मोहिम उद्देश व कार्यपध्दती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समाजात लपून राहिलेले कुष्ठ रूग्ण त्यांचा शोध घेणे, त्यांना बहुविश्व उपचाराखाली आणणे व संसर्गीकतेची साखळी खंडीत करून कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करणे या विषयावर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहिम प्रभावीपणे राबविण्याकरता गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागात २७१ व शहरी भागात ११ आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून त्वचारोग तथा कुष्ठरोग संशयीत तपासणी करणार आहे. आरोग्य सेवेचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांच्या मार्गदर्शनाने कुष्ठरोग मोहिम राबविण्यात येत आहे.