म्हसोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:20 AM2019-03-14T00:20:06+5:302019-03-14T00:20:28+5:30
श्री म्हसोबा महाराज की जयच्या जयघोषामध्ये देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज दोन दिवसीय यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
नाशिकरोड : श्री म्हसोबा महाराज की जयच्या जयघोषामध्ये देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज दोन दिवसीय यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सायंकाळी दर्शनासाठी व यात्रेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर फुलून गेला होता. देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त बुधवारी पहाटे राहुल बुवा, कोमल बुवा, प्रकाश चव्हाण, प्रियंका चव्हाण, दीपक मालुंजकर यांच्या हस्ते अभिषेक तर हेमंत गोसावी व कविता गोसावी यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर आठवडे बाजारातून वाजत-गाजत मांडव डहाळे मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली होती.
हभप त्रंबकबाबा भगत, अण्णा गुरूजी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, माजी खासदार समीर भुजबळ, पंच कमिटीचे अध्यक्ष शांताराम बापू कदम, नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, ज्योती खोले, सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, शाम खोले, सुधाकर जाधव, शंकर साडे, शांताराम घंटे, चंदू साडे, गिरीश मुदलियार आदी सहभागी झाले होते. पंच कमिटीच्या वतीने काश्मीर- मधील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून यात्रेत फेटे व गुलाल यांना फाटा देण्यात आला होता. यावेळी सूर्यभान घाडगे, बाळनाथ सरोदे, रूंजा पाटोळे, कैलास चव्हाण, राजेंद्र गायकवाड, पुंडलिक खोले, प्रदीप देशमुख, सुनील गायकवाड आदि उपस्थित होते. दुपारी परिसरातील भाविकांनी नैवेद्य दाखविण्यासाठी गर्दी केली होती.
सायंकाळी प्रथेप्रमाणे श्री म्हसोबा महाराज प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी व जत्रेत खरेदीसाठी भाविक, महिलांची मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. सायंकाळी गांधी पुतळा येथे उभारण्यात आलेल्या मंचावर ध्वनिक्षेपकाद्वारे भाविकांना सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते.
यात्रेमुळे बिटकोकडून विहितगावकडे जाणारी वाहतूक व विहितगावकडून येणारी वाहतूक सत्कार पॉइंट, सुभाषरोड, मालधक्का रोड, राजवाडा मार्गे वळविण्यात आली होती. उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी, नाशिकरोडचे नीलेश माइनकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आज कुस्त्यांची दंगल
श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त देवळालीगाव कुस्ती स्टेडियममध्ये गुरुवारी (दि़ १४) दुपारी ३ वाजेपासून कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. कुस्तीपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देवळालीगाव पंच कमिटीने केले आहे.
यात्रोत्सवानिमित्त आठवडे बाजारातून वाजत-गाजत मांडव डहाळे मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली होती. पंच कमिटीच्या वतीने काश्मीरमधील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून यात्रेत फेटे व गुलाल यांना फाटा देण्यात आला होता.