साईभक्तांसाठी फिरता दवाखना सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 05:50 PM2019-01-09T17:50:37+5:302019-01-09T17:51:04+5:30
सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावरून दरवर्षी शेकडो दिंड्या साईच्या दर्शनासाठी जातात. या महामार्गावर पायी पालख्यांतील भाविकांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत.
सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावरून दरवर्षी शेकडो दिंड्या साईच्या दर्शनासाठी जातात. या महामार्गावर पायी पालख्यांतील भाविकांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे भाविकांवर तातडीने उपचार होण्यासाठी वावी येथे साई संस्थानतर्फे फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच नंदा गावडे, उपसरपंच विजय काटे यांनी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्याकडे केली.
शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे हे शिर्डीहून मुंबईकडे जात असताना मंगळवारी दुपारी वावी येथे थांबवत ग्रामस्थांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. या मार्गावर वारंवार होणारे अपघात, त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या, अपघातातील जखमी भाविकांच्या पदरी आलेले कायमचे अपंगत्व याबाबत माहिती ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी डॉ. हावरे यांना दिली. गेल्या महिन्यात साई पालखीस झालेल्या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. भाविकांना तातडीने उपचार व्हावेत यासाठी संस्थानतर्फे फिरता दवाखाना सुरू केल्यास अनेकांचे प्राण वाचतील. जखमींवर वेळेवर उपचार होतील. ही बाब उपसरपंच काटे यांनी हावरे यांच्या निदर्शनास आणून दिली. पाथरे कालवा ते सिन्नर या दरम्यान हा दवाखाना कार्यान्वित करावा. वावी हे मध्यवर्ती ठिकाण त्यासाठी निवडावे, अशी अपेक्षा यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केली.