सिन्नरला मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:18+5:302021-04-07T04:14:18+5:30
रब्बीच्या हंगामासाठी मका खरेदीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट अजून शासनाने जाहीर केले नसले तरी आजपासून शेतकरी ऑनलाइन पद्धतीने आपल्या मक्याची नोंद ...
रब्बीच्या हंगामासाठी मका खरेदीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट अजून शासनाने जाहीर केले नसले तरी आजपासून शेतकरी ऑनलाइन पद्धतीने आपल्या मक्याची नोंद करू शकणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आधारकार्ड, बँकेचे पासबुक यांची झेरॉक्स, बँकेचा आयएफएस कोड, रब्बीच्या मक्याची नोंद असलेला सात-बाराचा उतारा घेऊन खरेदी- विक्री संघाच्या सिन्नर येथील मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष जाऊनही शेतकरी ऑनलाइन नोंदणी करू शकतील.
जिल्ह्यात मक्याचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजारात हजार-बाराशे रुपये क्विंटल दराने मक्याची विक्री करावी लागायची. त्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागायचा. त्यातून सुटका व्हावी व मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने सलग दुसऱ्या वर्षी शासनाने रब्बीच्या मका खरेदीला मंजुरी दिली आहे. मागील खरिपाच्या हंगामात शासनाने १८५० रुपये क्विंटल दराने मका खरेदी केला होता. त्यानुसार खरेदी -विक्री संघाच्या खरेदी केंद्रावर तालुक्यातील ६०० शेतकऱ्यांचा १५ हजार ६०० क्विंंटल मका खरेदी केला होता. खरेदीनंतर अवघ्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मक्याची एकूण दोन कोटी ८८ लाखांची रक्कम जमा करण्यात आली होती.
कोट...
मका भरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बारदानाचा तुटवडा भासल्याने अनेकदा मका खरेदी थांबविण्याची वेळ खरेदी- विक्री संघाला दरवर्षी येत होती. या बाबीकडे संघाने पणन महामंडळासह शासनाचे लक्ष वेधत पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत शासनाने तालुका संघाला ५० हजार बारदान आगाऊ पाठवली आहेत. त्यामुळे यंदा खरेदीत कुठलाही अडथळा येणार नाही.
- कचरू गंधास, अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ.