पेठ तालुक्यात भात कापणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:09 PM2018-11-28T17:09:20+5:302018-11-28T17:10:35+5:30
पेठ : नाशिक जिल्हयाचे पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यातील जनतेला यावर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असून अनियमीत व वेळेपूर्वीच पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामाची पुरती वाट लागली असून भात व नागलीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

पेठ तालुक्यात यावर्षी सुरुवातीच्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र नंतरच्या काळात पावसाने ओढ दिल्याने ऐन पिकभरणीच्या काळात भात, नागली सह वरई, खुरासणी, ऊडीद या पिकांवर परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरश: चारा गोळा करण्याची वेळ आली आहे. खरीप पिकाच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंतचा खर्चही वसूल होणार नसल्याने आदिवासी शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
स्थलांतराचे प्रमाण वाढले...
खरीप हंगामाचे पिक हातचे गेल्याने टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी शेतकरी व शेतमजूर यांनी तालुक्याबाहेर स्थलांतर केले आहे. जिल्हयातील निफाड, पिंपळगाव, ओझर, नाशिक, मातोरी आदी भागात रोजगारानिमित्त कुटूंबासह स्थलांतर केल्याने नाव-पाडे ओस पडू लागली आहेत. पेठ व हरसूल भागातील शेतमजूर दररोज गिरणारे व उमराळे या ठिकाणी मजूरांचे अड्डे सुरू झाले आहेत. जवळपास ३० ते ५० किमी खाजगी वाहनातून प्रवास करून रोजगार शोधतांना शेतमजूर दिसून येत आहेत.