रिव्हरसाइड गोल्फ स्पर्धेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:30 AM2020-12-13T04:30:53+5:302020-12-13T04:30:53+5:30
नाशिक : निफाडनजीकच्या भव्य रिव्हरसाइड गोल्फ कोर्सवर शनिवारी गोल्फ स्पर्धेला प्रारंभ झाला. विशेष सेवा पदकप्राप्त एअर कमोडोर ...
नाशिक : निफाडनजीकच्या भव्य रिव्हरसाइड गोल्फ कोर्सवर शनिवारी गोल्फ स्पर्धेला प्रारंभ झाला. विशेष सेवा पदकप्राप्त एअर कमोडोर श्यामसुंदर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी स्वतः गोल्फ खेळून या स्पर्धेचे औपचारिक उदघाटन केले.
नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये निवृत्त विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी त्यांच्या २० एकर जागेत भव्य असे गोल्फ कोर्स तयार केले आहे. त्यावरील या गोल्फ स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी क्रीडा संघटक राजीव देशपांडे, जिल्हा सचिव आणि स्पर्धेचे समन्वयक नितीन हिंगमिरे, तांत्रिक समिती प्रमुख ब्रिगेडियर ए. के. सिंग, सदस्य स्नेहल देव, क्रीडा समीक्षक आनंद खरे, शशांक वझे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना एअर कमोडोर श्यामसुंदर यांनी गोल्फ या खेळात आपल्याला स्वतःशीच स्पर्धा करावी लागत असल्याने हा खेळ अन्य खेळांपेक्षा वेगळा ठरतो. तसेच इतर खेळाप्रमाणे गोल्फला वयाचे कोणतेही बंधन नाही, त्यामुळे या खेळाचा फायदा सर्व वयाच्या खेळाडूंना मिळतो, असे नमूद करतानाच गोल्फसाठी केलेल्या सुविधांचेही त्यांनी कौतुक केले. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी सामान्यांसाठी गोल्फ या बागमारांच्या इच्छाशक्तीत शासनाचाही साहभाग असावा, या हेतूने त्यांना साहित्य, तसेच खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले. शासनाकडून सुविधा दिले जाणारे अशाप्रकारचे हे एकमेव गोल्फ कोर्स असल्याचे नाईक यांनी नमूद केले. आयोजक प्रदीप बागमार यांनी या खेळाला सर्वसान्यांपर्यंत नेण्यासाठी गत ३ वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यासाठी आतापर्यंत विविध शाळांमधील २००० विद्यार्थ्यांना गोल्फची ओळख करून देण्यात आली. सध्या कोविडचा प्रादुर्भाव असूनही या स्पर्धेत ६० गोल्फर्सनी आपला सहभाग नोंदविला असल्याचे त्यांनी नमूद केले. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिषेक मित्रा, मागील वर्षीचा विजेता आशीष केरोसिया, रिषभ वर्मा, श्रीमती यालिसी वर्मा यांचा समावेश आहे.
फोटो (१२गोल्फ)
नाशिकच्या निफाड येथील रिव्हर साइड येथील गोल्फ कोर्सवर आयोजित गोल्फ स्पर्धेचे उदघाटन करताना एअर कमोडोर श्यामसुंदर. समवेत जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, विंग कमांडर प्रदीप बागमार, ए. के. सिंग आदी.