राज्यस्तरीय भजन स्पर्धेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:52 PM2020-01-29T22:52:31+5:302020-01-30T00:11:48+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे तपोवनातील राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी आश्रमात दोनदिवसीय २६व्या कामगार पुरुष व १६व्या महिला राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी (दि.२९) सकाळी या स्पर्धेचा शुभारंभ महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
पंचवटी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे तपोवनातील राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी आश्रमात दोनदिवसीय २६व्या कामगार पुरुष व १६व्या महिला राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी (दि.२९) सकाळी या स्पर्धेचा शुभारंभ महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या स्पर्धेसाठी धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, चिपळूण आदींसह राज्यभरातील कामगार भजनी मंडळ संघाचे पाचशे कलाकार सहभागी झाले आहेत. यात १९ कामगार भजनी मंडळे तर १९ महिला भजनी मंडळे अशा ३८ संघांनी सहभाग घेतला. भजनी मंडळांनी जय जय रामकृष्ण हरी, अभंग, तसेच गवळण सादर केल्या. राज्यस्तरीय भजनी मंडळात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भजनी मंडळाला १० हजार, द्वितीय ८ हजार तर तृतीय क्रमांकाला ६ हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ भजनी मंडळाला ३ हजार रुपये रोख चषक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय पखवाज, टाळ, हार्मोनियम, तबलावादक यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी भगीरथ काळे, सहायक आयुक्त सयाजी पाटील, विश्वस्त मधुकर जेजुरकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुमित्रा सोनवणे, हर्षद वडजे, नीलेश गाढवे आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कल्याण आयुक्त डॉ. घनश्याम कुळमेथे यांनी तर राजेंद्र नाके यांनी सूत्रसंचालन केले. गुरुवारी (दि.३०) सायंकाळी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.