उपसा जलसिंचन योजना सुरू करा
By admin | Published: August 6, 2016 11:17 PM2016-08-06T23:17:30+5:302016-08-06T23:18:11+5:30
अधिवेशन : राजाभाऊ वाजे यांनी केली मागणी
सिन्नर : आदिवासी विभागातील उपसा जलसिंचन योजना लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली.
आदिवासी विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील विषयावर चर्चा करताना आमदार वाजे बोलत होते. जनजाती उपाय योजने अंतर्गत कृषी सिंचन योजनेकरिता २७ कोटी व जनजाती उपाय योजनेअंतर्गत कृषी उन्नत योजनेसाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सिन्नर मतदारसंघातील व इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील बाल भैरवनाथ आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजना तसेच बाल भैरवनाथ आदिवासी सहकारी उपसा जलसिंचन योजना चौरेवाडी, भरवीर खुर्द अशा दोन उपसा जलसिंचन योजनांना मंजुरी मिळालेली आहे. मंजूर मिळूनदेखील निविदा होत नाही. त्या तातडीने व्हाव्यात, अशी मागणी आमदार वाजे यांनी केली.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना या विभागामार्फत अंध व्यक्तींसाठी ४ कोटी ३ लाख, मूकबधिर व्यक्तींसाठी सात कोटी ३२ लाख, अंध व विकलांग व्यक्तीसाठी ५ कोटी ७२ लाख व मनोविकलांग व्यक्तीसाठी पाच कोटी ६९ लाख एवढी तरतूद या व्यक्तींच्या संस्थांसाठी केलेली आहे. कागदावरील संस्थांसाठी मदत न देता या घटकातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदत पोहचली पाहिजे अशी मागणीही वाजे यांनी यावेळी केली. (वार्ताहर)