प्रशासकांमुळे कामांचा रखडला शुभारंभ
By admin | Published: April 15, 2015 10:20 PM2015-04-15T22:20:20+5:302015-04-15T22:20:59+5:30
संभ्रम : तहसीलदारांची नियुक्ती
नाशिक : जिल्हा परिषदेंतर्गत दलितवस्ती कामांचा शुभारंभ विविध तालुक्यांत करण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. सर्वात मोेठा अडसर सहा ग्रामपंचायतींवर तहसीलदार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याने या कामांच्या उद्घाटनाला तांत्रिक अडथळा आल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत दलितवस्ती कामांचा शुभारंभ करण्यासाठी सभापती उषा बच्छाव यांना देवळा तालुक्यात विविध कामांच्या शुभारंभासाठी जायचे असताना ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आणि देवळा ग्रामपंचायतीचा पदभार तहसीलदार यांनी प्रशासक म्हणून स्वीकारल्याने या कामांचे उद्घाटन तांत्रिक अडचणीत सापडले आहे. एकट्या देवळा तालुक्यातच ही आचारसंहिता व तांत्रिक अडचण नसून अन्य ग्रामपंचायतींचेही नगर परिषद/नगर पंचायतीमध्ये रूपांतर झालेले असल्याने तेथेही तांत्रिक अडचण उद्भवणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)