जलकुंभ स्लॅबच्या कामास सुरुवात
By admin | Published: November 29, 2015 11:05 PM2015-11-29T23:05:07+5:302015-11-29T23:05:36+5:30
देवळा : जलवाहिनीत प्राणी आढळला नसल्याचा दावा
देवळा : देवळा सामुदायिक पाणीपुरवठा विभागाच्या सरस्वतीवाडी येथील जलकुंभातून शनिवारी बोकडसदृश प्राणी वितरण व्यवस्थेच्या जलवाहिनीत वाहून आल्यानंतर संबंधित विभागाने त्याची दखल घेऊन रविवारी जलकुंभाच्या कोसळलेल्या स्लॅबच्या कामास सुरुवात केली.
परंतु जलवाहिनीत अडकलेला प्राणी काढण्यासाठी गॅसकटरने पाईपलाईन कट केल्यानंतर त्या ठिकाणी प्राणी आढळून आला नाही. पाण्याच्या दाबामुळे सदर प्राणी अथवा त्याचे अवशेष पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहून गेले असावेत. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दहा महिन्यांपूर्वी देवळा सामुदायिक नऊ गाव पाणी पुरवठा योजनेचा सरस्वतीवाडी येथील जलकुंभाचा (क्षमता ४ लाख ५० हजार लिटर) स्लॅबचा बरचसा भाग कोसळला होता. यामुळे सदरची योजना धोक्यात आली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थानी त्याा पाठपुरावा केला. भविष्यात येणाऱ्या धोक्याच्या सुचना देखील जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांचेकडे केल्या होत्या.
परंतु ह्या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांमध्येच योजनेच्या देखभाल व दुरुस्तीबाबत समन्वय नसल्याने स्लॅब दुरुस्तीचे काम रखडले होते. त्यावेळी योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासने देऊन वेळ निभाऊन नेली. जि.प.चे कृषी सभापती केदा आहेर व समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी जिल्हापरिषदेत वेळोवेळी जलकुंभाच्या स्लॅब दुरुस्तीचा प्रश्न मांडला व त्या कामास मंजुरी मिळवली. मात्र ह्या कामासाठी ठेकेदाराची नेमणुक न झाल्याने काम रेंगाळले होते.
१९७२ साली निर्माण करण्यात आलेली ही पाणी पुरवठा योजना जीर्ण झाली आहे. सरस्वतीवाडी येथील जलकुंभ स्लॅब कोसळल्याने उघडा झाला आहे. त्याला कोणतेही संरक्षण नाही.
जलकुंभापर्यंत कोणीही सहज जाऊ शकते. असलेल्या पायऱ्यांचे बांधकाम ढासळून गेले आहे. याठिकाणी पथदीप सोय नसल्याने रात्रीच्यावेळी अंधार असतो. जलकुंभाशेजारी असलेल्या झाडांवर १० ते १५ धोकादायक असलेल्या भदुर मधाची पोळी आहेत.
परिसरात सर्वत्र अस्वच्छता आहे. योजनेची जबाबदारी असलेला अधिकारी मुख्यालयी राहात नाही. अनेक अडचणींना तोंड देत स्थानिक पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांच्या जीवावर हि योजना कशीबशी तग धरुन आहे. (वार्ताहर)
नागरिकांकडून
स्वागतलोहोणेर येथून जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे पाणी जलकुंभाच्या स्लॅब दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने त्यात टाकता येणार नाही. पाईपलाईन बायपास करुन जलकुंभाच्या वितरीकांना जोडून नऊ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. स्लॅबचे काम त्वरीत सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.