बंद उद्योग सुरु करण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 05:56 PM2018-09-25T17:56:02+5:302018-09-25T18:00:59+5:30
सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीतील बंद उद्योग चालू व्हावे, यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरु आहेत. शासनाच्या सेल्स टॅक्स वगैरे विविध विभागांच्या किचकट अडचणींवर मात करीत बंद उद्योग सुरू करण्याचे एक मॉडेल विकसीत केले असल्याचे तसेच बंद उद्योगांना बिले न पाठविण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अविनाश तांबे यांनी सांगितले.
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष रामदास दराडे, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, संचालक अरूण चव्हाणके, पंडित लोंढे, संदीप आवारे, प्रभाकर बडगुजर, सुनील कुंदे, चिंतामण पगारे, मीनाक्षी दळवी आदी उपस्थित होते.मालक परागंदा असताना संस्थेकडून बंद उद्योगांचा जीएसटी भरला जात होता. हा जीएसटी जेव्हा या कारखान्याची विक्री होईल तेव्हा परत संस्थेला मिळू शकेल असे असताना जर व्यवहार झालाच नाही तर संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांचे सहकार्य लाभत असल्याचे नमूद केले.सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीने भविष्यात एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन केलेले आहे. संस्थेच्या मालकीच्या १६ एकर जागेत एकच मोठा उद्योग आणण्याचा प्रयत्न होता. मात्र, तसे शक्य होत नसल्याने २५ ते ३० उद्योजकांसाठी प्लॉट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अविनाश तांबे यांनी केली. संस्थेच्या त्याच जागेतील एॅमेनीटीज प्लॉटमध्ये व्यापारी संकुल, पेट्रोलपंप किंवा चांगले हॉटेल उभारून संस्थेला उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत वाढविण्याचा मानस असल्याचे सांगून तांबे यांनी येत्या मासिक बैठकीत संचालक मंडळापुढे हा विषय ठेवणार असल्याचे सांगितले. दरम्यान संस्थेचे तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे यांनी औद्योगिक वसाहतीतील बंद उद्योगाबाबतचे धोरण बदलण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगतानाच विविध पातळ्यांवर संस्थेच्यावतीने उद्योग विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले.सभेदरम्यान उद्योजक शुक्लेश्वर वर्पे, बाबासाहेब दळवी, शिवाजी आवारे, ओमप्रकाश शिरापुरे, अतूल अग्रवाल, मधुकर जगताप, प्रमोद महाजन, अनिल आसावा, मुटकुळे, शिवाजी आवारे आदींसह उद्योजकांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी उद्योजक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.