नाशिककरांचा विरोध डावलून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास प्रारंभ
By संजय पाठक | Published: November 25, 2023 11:33 AM2023-11-25T11:33:10+5:302023-11-25T11:33:42+5:30
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या संदर्भात चार आठवड्यापूर्वी आदेश दिले होते.
नाशिक- मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठीनाशिक जिल्ह्यातील दारणा धरणामधून पाणी सोडण्यास आमदार- खासदार, राजकिय नेते आणि शेतकाऱ्यांचा विरोध जुगरून अखेरीस मध्यरात्री पाणी सोडण्यात आले आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या संदर्भात चार आठवड्यापूर्वी आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर येथून राजकीय विरोध सुरू झाला होता तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र महामंडळाच्या आदेशाला स्थगिती मिळाली नाही. नाशिक जिल्ह्यात यंदा जेमतेम 60 टक्के पाऊस झाला आहे त्यामुळे आता पासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. शेतीला योग्य वेळी पाणी मिळाले नाही तर शेती उद्ध्वस्त होईल अशी भीती आहे. त्यातच पाणी टंचाई असताना नाशिक आणि नगर मधून 9 टीएमसी पाणी सोडल्यास जायकवाडी पर्यँत 6 टीएमसी पाणी पोहोचणार असुन 9 टीएमसी लॉसेस आहेत त्यामुळे नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्यास विरोध होत होता.
दरम्यान काल रात्री जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दारणा धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश दिले त्यानुसार मध्यरात्री 200 क्यूसेक वेगाने इतके पाणी सोडण्यात आले आहे गोदावरी पात्रावरील कालव्यांच्या फळ्या काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर हळूहळू पुढील विसर्ग करण्यात येणार आहे. दारणा धरण समूहातून 2.643 टीएमसी आणि गंगापूर धरणातून .5 म्हणजे अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश असून त्यापैकी तूर्तास केवळ दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.