जन्म-मृत्यू दाखल्यावर परराज्यातील पत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:24 PM2020-02-27T18:24:31+5:302020-02-27T18:25:46+5:30
मालेगाव: मनपातर्फे देण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यांवरील क्यूआर तपासणीत स्थानिकांचा पत्ता थेट परराज्यातील आढळून येत असल्याने जन्म-मृत्यू दाखला घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मालेगाव मध्य : मनपातर्फे देण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यांवरील क्यूआर तपासणीत स्थानिकांचा पत्ता थेट परराज्यातील आढळून येत असल्याने जन्म-मृत्यू दाखला घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाने क्यूआर कोडची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी आमदार आसीफ शेख यांनी महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
एनआरसी व सीएए कायद्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा धसका घेत मनपाकडे जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी हजारो अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
त्यानुसार महापालिका आरोग्य विभागाकडून अर्जदारांना जन्म-मृत्यू दाखले वितरित करण्याची कार्यवाहीही जोमात सुरू आहे. २ फेब्रुवारीपासून वितरित करण्यात आलेल्या दाखल्यांवरील क्यूआर कोडची तपासणी केली असता त्यात काही दाखल्यांवरील मूळ नाव व पत्त्याऐवजी इतर राज्यांतील नाव व पत्ता आढळून येत आहे.
सोशल मीडियावरून व्हायरल
याबाबतचा एक व्हिडीओच सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने अनेकांनी आपल्या दाखल्यांवरील क्यूआरकोड स्कॅन करून सत्यता तपासली असता अनेकांचे पत्ते राज्याबाहेरील आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. म्हणून क्यूआर कोडबाबत आॅनलाइन सुविधा देणाºया एजन्सीला पाचारण करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.