वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे वर्धा येथे राज्य अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:32 AM2021-01-13T04:32:56+5:302021-01-13T04:32:56+5:30
मालेगाव : वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे यावर्षीचे राज्य अधिवेशन वर्धा येथे घेण्यात येणार असून, त्याची ...
मालेगाव : वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे यावर्षीचे राज्य अधिवेशन वर्धा येथे घेण्यात येणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती अधिवेशनाचे संयोजक व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी दिली.
या अधिवेशनाच्या तयारी संदर्भात राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक झाली. यावेळी सरचिटणीस बालाजी पवार, गोरख भिलारे, रवींद्र कुलकर्णी, सुनील मगर, भारत मालवे, संजय पावसे, विकास सूर्यवंशी, दत्तात्रय घाटगे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनाचे उद्घाटन ऑल इंडिया न्यूजपेपर डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक राकेश पाण्डेय (कानपूर, उत्तर प्रदेश) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पाटणकर यांनी सांगितले की, वर्धा व परिसरात अद्यापही कोरोनाची परिस्थिती पूर्ण नियंत्रणात नाही. त्यामुळे अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. शासकीय नियमांचे पालन करत व सर्व पदाधिकारी विक्रेत्यांची काळजी घेत हे अधिवेशन पार पाडावे लागणार आहे. यावेळी संघटनेच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होऊन पुढील दिशा ठरवली जाईल. राज्य संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार यांनी संख्येबाबत बंधन असल्याने या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती दिली. हे अधिवेशन फेसबुक लाईव्ह करण्याची सूचना विकास सूर्यवंशी व दत्ता घाडगे यांनी मांडली. या चर्चेत कोषाध्यक्ष भिलारे, गोरख भिलारे, विकास सूर्यवंशी (पंढरपूर), संजय पावशे (मुंबई), विनोद पन्नासे (चंद्रपूर), रवींद्र कुलकर्णी (मालेगाव), सुनील मगर, भारत मालवे (नाशिक), संतोष शिरभाते (यवतमाळ), अण्णासाहेब जगताप, राजेंद्र टिकार (बुलढाणा) यांच्यासह विविध जिल्ह्यातील राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.