राष्टवादी कॉँग्रेसचे राज्य सरकारला ५६ प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:23 AM2018-10-30T01:23:19+5:302018-10-30T01:23:44+5:30
भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नांची जनतेला उत्तर देऊन आपली पारदर्शकता दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
नाशिक : भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नांची जनतेला उत्तर देऊन आपली पारदर्शकता दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात सोमवारी पक्ष प्रवक्त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे की, मोठे दावे करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने खोट्या आश्वासनांचे फुगे व अच्छे दिनचे निव्वळ बुडबुडे सोडून सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये काहीच ठोस काम केलेले नाही. नोटबंदी, महागाई, इंधनाचे वाढते दर व यामुळे सर्वसामान्यांचे मोडलेले कंबरडे, कर्जाच्या खाईत ढकलेले राज्य, सतत ढासळत जाणारा कृषी विकासाचा दर, कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न, महिलांची सुरक्षितता, दीर्घकाळ प्रलंबित असलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून हमीभावापर्यंतचे प्रश्न कायम आहेत. सरकारकडून सनातनी व जातीयवादींना पाठबळ मिळत असून, त्यामुळे संविधान व लोकशाहीची पायमल्ली होत आहे. अशा स्वरूपाचे ५६ प्रश्न सोशल मीडियासह इतर माध्यमातून सरकारला विचारले आहे. निम्म्या मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर मुख्यमंत्र्यांना केवळ धुलाई कामगार बनावे लागत आहे. त्यातच चार वर्षांची संधी वाया गेली आहे. बारा हजार कोटी जाहिरातींवर खर्च करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने चार वर्षे पूर्ण झाली. हा कालावधी म्हणजे निव्वळ पोकळ घोषणा, निष्क्रिय कारभार असून, भाजपाप्रणित नेतृत्वाखालील सरकार चौथा वर्धापनदिन साजरा करत असताना विकासाच्या मुद्द्यावर कुठलीच वाढ झालेली नसल्याने या मुहूतार्ला ‘वर्धापनदिन’ का म्हणायचा? असा प्रश्न डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी विचारला आहे.
भाजपा निरुत्तर
सत्ताधारी ५६ इंच छातीवाल्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ५६ प्रश्न विचारण्यात आले असून, भाजपाचे अनेक नेते सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ते या मुद्द्यांना व प्रश्नांना उत्तर देतील अशी अपेक्षा व्यक्त करून एकाही मुद्द्याला एकही भाजपाच्या नेत्याने उत्तर दिले नसल्यामुळे जनतेसाठी हे प्रश्न खुले करण्यात आल्याचे पवार, ठाकूर यांनी सांगितले.