फेब्रुवारीत वकिलांची राज्यस्तरीय परिषद; इमारतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:16 PM2020-01-20T23:16:40+5:302020-01-21T00:15:25+5:30
महाराष्टÑ व गोवा वकील परिषद आणि नाशिक वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायलयात होणार असल्याची घोषणा अॅड. नितीन ठाकरे यांनी केली. या परिषदेला सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थित राहणार असून, परिषदेच्या दुसऱ्या दिवशी न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
नाशिक : महाराष्टÑ व गोवा वकील परिषद आणि नाशिक वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायलयात होणार असल्याची घोषणा अॅड. नितीन ठाकरे यांनी केली. या परिषदेला सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थित राहणार असून, परिषदेच्या दुसऱ्या दिवशी न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
नाशिक बार असोसिएशनची वार्षिक सर्वसधारण सभा सोमवारी (दि.२०) एचआरडी सेंटरमध्ये खेळीमेळीत तर काहीशी गोंधळाच्या वातावरणात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीस ठाकरे यांनी नाशिक बार असोसिएशनच्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी जेमएफसी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर उपाध्यक्ष अॅड. प्रकाश आहुजा, सचिव अॅड. जालिंदर ताडगे, अॅड. श्यामला दीक्षित, अॅड. संजय गिते आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते परिषदेचे उद््घाटन होणार आहे. परिषदेला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह राज्यभरातील वकील हजेरी लावणार आहे. नाशिक बार असोसिएशनच्या ३३ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. त्यामध्ये वाढ झाली असून, आता ३८ लाख ७४ हजारांच्या ठेवी आहेत. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलांच्या दोन संघटना आहेत. नाशिक बार असोसिएशन ही संघटना नोंदणीकृत असून, महानगर अॅडव्होकेट संस्था ही अधिकृत नसल्याचे ठाकरे म्हणाले. याबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक करू नये, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गदारोळ
सभा खेळीमेळीत सुरू असताना अॅड. लीलाधर जाधव यांनी व्यासपीठाजवळ येत माइक घेऊन भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रश्नातून मांडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना मज्जाव करण्यात आला. यावेळी त्यांच्या हातातून माइक काढून घेतला असता जाधवदेखील आक्रमक झाले, त्यांनी पुन्हा माइक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पहिल्या रांगेत बसलेल्या ज्येष्ठ वकिलांनी उठून जाधव यांची समजूत काढत त्यांना बाजूला केले. यावेळी सभागृहात एकच गोंधळ उडाल्याने गदारोळ निर्माण झाला. यानंतर सभेच्या पटलावर ठेवण्यात आलेले विषय पूर्ण होत नाही, तोपर्यंत ऐनवेळी कोणीही प्रश्न मांडू नये, यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने आपले मुद्दे मांडावे, अशी सूचना केली गेली. दरम्यान, अॅड. झुंजार आव्हाड यांनीही मुस्कटदाबी हाते असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांवर केला.