राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:12 AM2017-09-18T00:12:23+5:302017-09-18T00:12:49+5:30
लहान मुलांनी भिंतीवर काढलेली चित्रे समजून घेण्यासाठी पालकांनी अद्ययावत राहिले पाहिजे. बालसाहित्य संमेलनाचे ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांना मिळत असतो, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक राजीव तांबे यांनी करून शंभर वर्षाच्या परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने दरवर्षी राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन भरवावे, असे आवाहनही केले.
नाशिकरोड : लहान मुलांनी भिंतीवर काढलेली चित्रे समजून घेण्यासाठी पालकांनी अद्ययावत राहिले पाहिजे. बालसाहित्य संमेलनाचे ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांना मिळत असतो, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक राजीव तांबे यांनी करून शंभर वर्षाच्या परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने दरवर्षी राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन भरवावे, असे आवाहनही केले.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, खजिनदार वैशाली गोसावी, संमेलन प्रमुख शोभना भिडे, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, कार्यक्रमप्रमुख अपर्णा क्षेमकल्याणी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले. यावेळी तांबे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील कविता व कथांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना जे सोपे वाटते ते आधी सोडवावे आणि जे कठीण असते त्यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही कथा किंवा कविता ही बोध उपदेशासाठी लिहिली नसून त्यातून विद्यार्थ्यांचा आनंद मिळवायचा असे तांबे यांनी नमूद करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनील कुटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी लिहिण्यासाठी वाचले पाहिजे, मन:शांती ठेवली पाहिजे व अंतकरणापासून लिहिण्याच्या वाटा शोधल्या पाहिजेत. या राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांना लेखन, काव्य, कथा लिहिण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन आयोजनासाठी संस्था निश्चितच प्रयत्नशील राहील असे सांगितले. दोन दिवसीय संमेलनाचा आढावा शोभना भिडे यांनी सादर केला. कार्यक्रमात कीर्ती यावलकर, युगंधा खोबरेकर, श्रीकृष्ण काळे, लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनानिमित्त आयोजित कविता लेखन, निबंध स्पर्धा यासह विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तिसºया सत्रात ‘प्रवास ज्ञानपीठाचा’ या कार्यक्रमात ज्ञानपीठ विजेत्या मराठी साहित्यिकांच्या साहित्य कृतीवर आधारित रंगमंच अविष्कार सादर करण्यात आले. सूत्रसंचलन रूपाली झोडगेकर यांनी केले. परिचय प्रसाद कुलकर्णी यांनी तर आभार वैशाली गोसावी यांनी मानले. यावेळी जयंत मोंढे, मधुकर जगपात, संजय पराजंपे, अलका कुलकर्णी, प्राचार्य प्र. ला. ठोके, संजीवनी धामणे, समीर लिंबारे आदी उपस्थित होते.