राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यास २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:37+5:302020-12-14T04:30:37+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी शुक्रवार (दि.११) पर्यंत नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी वेगवेगळ्या नियोक्त्यांकडून ऑनलाईन पद्धतीने निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, २० डिसेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्या उमेदवारांनाही या प्रक्रियेत थेट सहभागी होता येणार आहे.
राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या महारोजगार मेळाव्याचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले असून, १२ डिसेंबरपासून या मेळाव्यास सुरुवात झाली आहे. या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील विविध ४० नियोक्ता संस्थांमध्ये विविध ७३ पदांसाठी ३ हजार ७९१ जागा उपलब्ध असून या पदांसाठी आपली पात्रता सिद्ध करून रोजगार प्राप्त करण्यासाठी उमेदवारांना आता २० डिसेंबरपर्यंत वाढीव मुदत मिळाली आहे. या महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.rojgar.mahaswavam.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांनी २० डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून, ऑनलाईन नोंदणी झालेल्या उमेदवारांची माहिती नियोक्त्यांना उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्याकडून संबंधित उमेदवारांना ऑनलाईन मुलाखती आमंत्रित करण्यात येते. मुलाखतीचे आमंत्रण आल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून मुलाखत देऊन रोजगाराची संधी मिळविता येणार आहे. दरम्यान, वाढवलेल्या मुदतीच्या कालावधीत नियोक्त्यांना पुन्हा अधिकची रिक्तपदे अधिसूचित करता येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करता येणार आहे.