नाशकात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
By admin | Published: October 20, 2015 09:51 PM2015-10-20T21:51:29+5:302015-10-20T21:52:07+5:30
नाशकात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक आणि बाबाज् थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘बाबाज् करंडक’चे आयोजन येत्या ६ व ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा रंगणार आहे. बाबाज् थिएटरने यापूर्वीही लेखन, बालनाट्य, एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले असून, रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धेत अठरा संघ सहभागी होऊ शकणार आहेत. प्रत्येक एकांकिकेसाठी एक तासाचा कालावधी दिला जाणार आहे. एका कलावंताला एकाच एकांकिकेत अभिनय करता येणार आहे. या स्पर्धेसाठी २७ आॅक्टोबर ही फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका ‘मराठी रंगभूमी’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना १५ हजार (प्रथम), १० हजार (द्वितीय), ५ हजार (तृतीय) अशी पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. याशिवाय दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय, पार्श्वसंगीत, वाचिक अभिनय, सर्वोत्कृष्ट लेखन या प्रकारांतही रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी बाबाज् थिएटरचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे व स्पर्धाप्रमुख प्रवीण कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)