येवला महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र
By admin | Published: December 21, 2016 11:18 PM2016-12-21T23:18:07+5:302016-12-21T23:18:29+5:30
येवला महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र
येवला : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठीतील प्रवासवर्णने : काल, आज आणि उद्या’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील मराठी विभागाचे प्रमुख व भाषाअभ्यास प्रशाळेचे संचालक डॉ. म. सु. पगारे उपस्थित होते. ख्यातनाम समीक्षक व कवी प्रा. डॉ. एकनाथ पगार यांनी बीजभाषण केले. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यामंदिरचे सहसचिव प्राचार्य व्ही.एस. मोरे होते. उद्घाटनपर मनोगतात डॉ. म. सु. पगारे यांनी मराठीतील प्रवासवर्णने, वाङ्मयाची परंपरा व वाटचाल याचा आढावा घेतला. मराठी प्रवासवर्णनात धार्मिक स्थळे व त्याची वर्णने मोठ्या प्रमाणात आली असल्याचे सांगून आपल्या धार्मिकतेच्या दृष्टीपलीकडे भाषा, संस्कृती, लोकसाहित्य, परंपरा, निसर्गसौंदर्य यांचा व पर्यटनाचा निखळ आनंद घेता आला पाहिजे. प्रवासवर्णनातून माणूस जोडला जाऊन मानवतावादी जीवनमूल्ये असलेले संस्कार रु जवले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. एकनाथ पगार यांनी मराठी प्रवासवर्णनांची सुरुवात महानुभावांच्या स्थलमाहात्म्यपर साहित्यापासून व संत नामदेवांच्या ‘तीर्थावळी’ प्रकरणापासून तपासता येऊ शकते असे सांगून, आधुनिक मराठीतील प्रवासवर्णन वाङ्मयाची सुरुवात गोडसे भटजींच्या ‘माझा प्रवास’ यापासून मानली जाते.
चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले, तर समन्वयक प्रा. धनराज धनगर यांनी चर्चासत्र आयोजनामागील भूमिका मांडली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. लीना पांढरे यांनी केले. या चर्चासत्रासाठी ४३ संशोधक, प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले. (वार्ताहर)