राज्याचे पोलीस खेळाडू आशियाई, ऑलिम्पिक गाजवतील; CM एकनाथ शिंदे यांचा विश्वास
By अझहर शेख | Published: February 8, 2024 08:28 PM2024-02-08T20:28:48+5:302024-02-08T20:28:59+5:30
नाशिकमध्ये ३४व्या राज्यस्तरीय पोलीसक्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
नाशिक: महाराष्ट्र पोलिस दलाची क्रीडा स्पर्धा मानाची असून या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातील पोलिस खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्याने मैदान गाजविण्याची उत्तम संधी मिळते. राज्याच्या पोलिस खेळाडूंमध्ये आशियाई, ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांचे मैदान गाजविण्याची ताकद आहे, यात शंका नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नाशिकमधील त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये आयोजित ३४व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी (दि.८) एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, सुहास कांदे यांच्यासह राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलिस दलाचे राज्याचे अपर महासंचालक चिरंजीव प्रसाद, डॉ.निखिल गुप्ता, विशेष पोलिस महानिरिक्षक (प्रशासन) डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कायद्याचा प्रभावी वापर करणाऱ्यांकडे शारिरिक बळ, चपळाई, बुद्धीकौशल्य आणि जिद्द हे गुण महत्वाचे असतात. या गुणांचा विकास अशाप्रकारच्या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून होत असतो. पोलिसांमध्ये वरील सर्व गुण असतात मात्र त्यांना त्याचे सादरीकरण करण्यासाठी चालना मिळणे आवश्यक असते. यावेळी शिंदे यांनी आकाशात फुगे सोडून व मशालीने क्रीडा ज्योत प्रज्जवलित करत स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली.
प्रास्ताविकपर स्वागत मनोगतातून राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलिस क्रीडा स्पर्धेचा आजपर्यंतचा प्रवास सांगितला. २०२०साली कोरानाची साथ असल्याने नाशिकला पोलिस क्रीडा स्पर्धा होऊ शकली नव्हती. यावर्षी यजमानपदाची संधी पुन्हा नाशिकला मिळाली. अल्हाददायक वातावरण असलेल्या या पुण्यभूमीत खेळाडूंचा उत्साह शीगेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंची राज्यभरातून आलेले सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.