कृत्रिम पावसाच्या हुलकावणीत भुजबळ यांचे राजकीय रॉकेट लॉन्चिंग
By admin | Published: August 3, 2015 10:43 PM2015-08-03T22:43:27+5:302015-08-03T22:44:09+5:30
कृत्रिम पावसाच्या हुलकावणीत भुजबळ यांचे राजकीय रॉकेट लॉन्चिंग
येवला : कृत्रिम पावसासाठी अनुकूलता नसल्याने निसर्गचक्राच्या फेऱ्यांमुळे कृत्रिम पावसाने हुलकावणी दिली व रॉकेट लॉन्चिंग झाले नसले तरी शासनाने घोषणांचा पाऊस पडण्यापेक्षा दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याला भरीव अर्थसाहाय्य देऊन शेतकऱ्यांप्रति आपले उत्तरदायित्व पूर्ण करावे, असे म्हणत राज्य शासनावर रॉकेट लॉन्चिंग करण्याची संधी शेकडो शेतकऱ्यांसमोर अनौपचारिकरीत्या मात्र आमदार छगन भुजबळ यांनी साधली.येवला तालुक्यातील सायगाव परिसरात कृत्रिम पावसाच्या प्रयोगस्थळी आमदार छगन भुजबळ रविवारी दुपारी ४ वाजता आले. परंतु ८ तासांच्या प्रतीक्षेनंतर वातावरण अनुकूल नसल्याने कृत्रिम पावसासाठी रॉकेट लॉन्चिंग व सिल्व्हर आयोडाइड फवारणी झालीच नाही. ही माहिती आमदार छगन भुजबळ यांना मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल आॅफ प्रोफेशनल स्टडिजचे पथक प्रमुख अब्दुल रहेमान वान्नो यांनी दिली. दरम्यान, चातक पक्ष्यासारखी, परंतु कृत्रिम पावसाची वाट बघणारा शेतकरीवर्ग हिरमुसला. यावेळी पत्रकारानी आमदार छगन भुजबळ यांना राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असेच उदासीन आहे का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, सरकार उदासीन आहे किंवा नाही हे मला माहीत आहे; पण त्यांनी निदान केलेल्या घोषणांची अंमलबजावणी तरी करावी असे म्हणत, राजकीय रॉकेट लॉन्चिंग मात्र केले. (वार्ताहर)